खून, बलात्काराच्या घटनांमध्ये वर्षभरात वाढ
By admin | Published: December 27, 2014 05:12 AM2014-12-27T05:12:51+5:302014-12-27T05:12:51+5:30
खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून, वर्षभरात या गुन्ह्यांचे तब्बल ‘अर्धशतक’ पूर्ण झाले आहे. राजकीय संघटनेच्या
मंगेश पांडे, पिंपरी
खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून, वर्षभरात या गुन्ह्यांचे तब्बल ‘अर्धशतक’ पूर्ण झाले आहे. राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह कुख्यात गुंडाचा खून घटनेने शहरात कायदा-सुव्यवस्थे विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे अठरा लाख आहे. शहरात एकूण निगडी, पिंपरी, चिंचवड, सांगवी, हिंजवडी, भोसरी, एमआयडीसी, वाकड अशी सात पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांचा आकडा वाढतच आहे. दिवसेंदिवस गुन्ह्यांचा आलेख वाढत असल्याने शहरवासीय भीतीच्या सावटाखाली आहे.
जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत खुनाच्या एकूण ५० घटना घडल्या. यातील ४७ गुन्हे उघडकीस आले. व्यावसायिक वाद, प्रेमप्रकरणास विरोध, पूर्ववैमनस्य तसेच किरकोळ कारणावरून अधिकाधिक घटना घडल्या. खुनाच्या दोन घटनांमध्ये पिस्तुलांचा वापर झाल्याने शहरवासीय आणखीनच दहशतीखाली आले. पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक १० खुनाच्या घटना घडल्या. चिंचवड पोलीस ठाण्यात सर्वांत कमी ४ गुन्ह्यांची नोंद झाली.
वर्षभरात बलात्काराच्या तब्बल ५० घटना घडल्या. यामध्ये सर्वाधिक ११ घटना सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याच्या घटनाही अधिक आहेत. यामध्ये बापाकडून स्वत:च्या मुलीवर अत्याचाराच्या केलेल्या घटनाही समोर आल्या. गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेने तर सर्वत्र खळबळ उडाली. रेखाचित्राच्या साहाय्याने भोसरी पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली.
या घटना रोखण्यासाठी विविध स्तरावर उपाययोजना राबविण्याच्या घोषणा झाल्या. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे ठरले. मात्र, तरीही बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे समोर येणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
विनयभंगाच्या घटनांचाही वाढता आलेख आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल दुपटीने या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. १२७ गुन्हे दाखल झाले आहेत. चिंचवड ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक २८ गुन्ह्यांची नोंद आहे. महिलांमध्ये अधिक असुरक्षिततेचे वातावरण असून, त्यांना रस्त्यावर वावरणेही कठीण झाले आहे.
प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनाही अधिक आहेत. यंदाच्या वर्षीच्या ११ महिन्यांत परिमंडळ तीनमध्ये ५६ गुन्हे दाखल झाले. हे उघडकीस येण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत घरफोडीचे एकूण ३८६ गुन्हे घडले. त्यांपैकी ११५ दिवसा, तर २७१ रात्री झाल्याची नोंद आहे. दरोड्याच्या तयारीतील तसेच घरफोडी करणाऱ्या टोळ्या जेरबंद करूनही घरफोडीचे प्रमाण कमी झालेले नाही.