बायोगॅस प्रकल्पांची क्षमता पालिका वाढविणार

By admin | Published: October 15, 2015 01:15 AM2015-10-15T01:15:20+5:302015-10-15T01:15:20+5:30

शून्य कचरा मोहिमेत सुमारे १२ कोटी रुपये खर्च करून सुरू केलेल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्पांमधून अपेक्षित प्रमाणात गॅसनिर्मिती

To increase the capacity of biogas plants | बायोगॅस प्रकल्पांची क्षमता पालिका वाढविणार

बायोगॅस प्रकल्पांची क्षमता पालिका वाढविणार

Next

पुणे : शून्य कचरा मोहिमेत सुमारे १२ कोटी रुपये खर्च करून सुरू केलेल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्पांमधून अपेक्षित प्रमाणात गॅसनिर्मिती होत नसल्याने त्यात सुधारणा करण्यासाठी महापालिकेने तांत्रिक समितीची स्थापना केली आहे.
वर्षभरापूर्वी फुरसुंगी व उरुळी देवाची येथील ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केल्यानंतर त्यातून सुटका करून कचऱ्यापासून वीज तसेच बायोगॅस निर्मिती प्रकल्प सुरू करण्यावर भर दिला. शहरात कात्रज, बावधन, औंध, बाणेर, तळजाई, मॉडेल कॉलनी अशा सुमारे २० ठिकाणी प्रत्येकी ५ मेट्रिक टन क्षमतेचे २० प्रकल्प काही खासगी संस्थांच्या साह्याने सुरू करण्यात आले. रोज किमान १०० टन ओला कचरा वापरला जाणे अपेक्षित होते.
सुरुवातीच्या काळात हे प्रकल्प सुरू होते. नंतर मात्र अपेक्षित गॅस निर्मिती होणे थांबले. त्यामुळे आता त्यात रोज फक्त ७० ते ८० टन ओला कचराच वापरला जातो. गॅस निर्मितीही फक्त ५४ टक्केच होते.
कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती क्षेत्रात आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आले आहे. त्याचा वापर केल्यास महापालिकेच्या प्रकल्पांमध्ये सुधारणा होऊ शकते; मात्र महापालिकेकडे तंत्रज्ञ नाहीत. त्यामुळेच या प्रकल्पांसाठी आता घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त किशोरी गद्रे यांनी या तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली आहे. या समितीने सर्व प्रकल्पांचा अभ्यास करून काय त्रुटी आहेत, याचा अहवाल महापालिकेला द्यायचा आहे. त्याप्रमाणे बदल केल्यानंतर हे सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होतील.
वीजनिर्मितीसाठी महापालिकेने रामटेकडी येथील प्रकल्प सुरू करण्यास रोकेम या संस्थेला मान्यता दिली होती.
या प्रकल्पात सुमारे ७०० टन ओला व सुका कचरा वापरला जाणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडून फक्त २५० टन कचऱ्याचाच वापर केला जात आहे. हा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची तंबी महापालिकेने रोकेमला दिली आहे. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)
बायोगॅस निर्मितीतून गॅस इंजिनाद्वारे वीज तयार करून तिचा वापर त्या परिसरातील पथदिव्यांसाठी केला जावा, असे अपेक्षित आहे. मॉडेल कॉलनी येथील प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या गॅसपासून इंजिनाद्वारे वीज तयार करून तिचा वापर परिसरातील पथदिव्यांसाठी केला जातो; मात्र हे प्रमाणही कमी आहे. तसेच, काही ठिकाणच्या प्रकल्पांमध्ये यासाठी लागणारी तांत्रिक सुविधा नाही. त्यामुळे तिथे तयार होणारा गॅस जाळला जातो. शहरात निर्माण होणारा कचरा शहरातच जिरवला जावा, हा मूळ उद्देश असल्यामुळे वीजनिर्मिती व त्याचा वापर याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.

Web Title: To increase the capacity of biogas plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.