दुष्काळाच्या झळांत वाढ : खेड तालुक्यात पशुधन विक्रीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:25 AM2018-12-25T00:25:50+5:302018-12-25T00:27:22+5:30
खेड तालुक्याच्या पूर्व भागात यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवली असल्याने नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. जनावरांचा चारा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक पशुपालकांनी पशुधनाची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
दावडी - खेड तालुक्याच्या पूर्व भागात यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवली असल्याने नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. जनावरांचा चारा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक पशुपालकांनी पशुधनाची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. मात्र भावही चांगला मिळत नसल्याने चाऱ्याअभावी जनावरांचे होणारे हाल सहन होत नसल्याने पशुपालकांना कमी भावात जनावरांची विक्री करावी लागत आहे.
खेड तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर दुष्काळी संकट निर्माण झाले आहे. एवढी दुष्काळी झळाची परिस्थिती निर्माण होऊनही स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. गेल्या पाच वर्षांतील यंदाचा दुष्काळ भयानक आहे. विहिरी, बोअरवेल यांच्यात उपलब्ध थोड्याफार पाण्यावर मदार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पूर्व भागातील चिंचबाईवाडी, टाकळकरवाडी, चौधरवाडी, कनेरसर, वरुडे, वाफगाव, वाकळवाडी, गुळाणी, गोसासी या गावांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरात दिवसेंदिवस दुष्काळ उग्र रूप धारण करत असतानाच पशुधनाच्या चाºयाबरोबरच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पशुधन पालक अडचणीत सापडला आहे. आता जनावरांना काय काय खायला घालायचे हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे म्हणून शेतकरी आपल्या पशुधनाची विक्री बेभाव करीत आहे. परिसरातील कनेरसर मंडळ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले असून, परंतु सध्या स्थितीला जनावरांच्या चाºयाचा आणि पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
सध्या स्थितीला जनावरांना शेतातील उपलब्धतेनुसार चारा खाऊ घातला जात आहे. परंतु आता शेतीच्या मशागतीचे काम संपले असताना दुष्काळ परिस्थितीमुळे दुभती जनावरे शेतीचे काम करणारे बैल कसे सांभाळायचे हा प्रश्न उभा राहिला आहे. काही शेतकरी जनावरे उपाशी मरू नये म्हणून बाहेरून हिरवा चारा विकत घेत आहेत. काही शेतकºयांकडे चारा नसल्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावाने जनावरे विकू लागला आहे. दुष्काळ असल्यामुळे जनावरांच्या चाºयासाठी एका पेंडीला तीस रुपये मोजावे लागत आहे. एवढा खर्च कुठून करायचा, असा प्रश्न पशुपालकासमोर असल्याने शेतकरी जनावरांची बेभाव विक्री करत आहेत. परिसरात प्रत्येक ठिकाणी पाणीटंचाई भासत असून त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील महिन्यात आमदार सुरेश गोरे, तहसीलदार सुचित्रा आमले पाटील व कृषी विभागाने या भागाचा दुष्काळी पाहणी दौरा केला होता. त्या वेळी मागेल त्या गावाला टँकर देऊ तसेच जेणेकरून जनतेची पाण्यासाठी पायपीट होणार नाही. चारा छावणी, दावणीला चारा पाणी देऊन मुक्या जनावरांचा चाराप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप दुष्काळ कागदावरच आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
नदी कोरडी; बंधाºयात अल्प पाणीसाठा
पूर्व भागातून जाणारी वेळ नदी कोरडी पडली आहे. अजून दुष्काळाचे सहा महिने कसे जाणार, अशी चिंता येथील शेतकºयांना सतावत आहे. वेळ नदीवरील वाफगाव येथील मातीच्या बंधाºयात तीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तोही शेतकरी पिकांसाठी पाण्याचा उपसा करीत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई या परिसरात होणार असल्याचे चित्र दिसत आहे. गुळाणी येथील तलावात वीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे येथेही पाणीटंचाई होणार आहे.
जनावरांच्या किमतीत निम्म्याने घट
बाजारात जनावरांची मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत असल्याने पशुधनाचेही दर उतरले आहेत. एरवी साठ ते सत्तर हजार रुपयांना मिळणारी बैलजोडी पंचवीस-तीस हजार रुपयांना मिळत आहे.