एफटीआयआय, सत्यजित रे इन्स्टिट्यूटमधील शुल्कवाढीचा विद्यार्थ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:04 PM2018-02-21T13:04:41+5:302018-02-21T13:07:18+5:30

increase fees & exam charges in FTII, Pune, Satyajit Ray Institute, kolkata | एफटीआयआय, सत्यजित रे इन्स्टिट्यूटमधील शुल्कवाढीचा विद्यार्थ्यांना फटका

एफटीआयआय, सत्यजित रे इन्स्टिट्यूटमधील शुल्कवाढीचा विद्यार्थ्यांना फटका

googlenewsNext
ठळक मुद्देदेशातील प्रतिष्ठित अशा दोन संस्थांनी प्रथमच एकत्रितपणे घेतली सामायिक परीक्षाटीव्ही अभ्यासक्रमासाठी यंदाच्या वर्षी कमी संख्या आहे, असे काही नाही : कँथोला

पुणे : वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) आणि कोलकत्याची सत्यजित रे इन्स्टिट्यूट या दोन्ही संस्थांची एकत्रितपणे सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात आली खरी; मात्र यंदाच्या वर्षी फिल्म आणि टीव्ही दोन्ही अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेश परीक्षा शुल्क ४ हजार रुपये ठेवण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांनी एकाच अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा देण्याचा पर्याय निवडला. यामध्ये फिल्म अभ्यासक्रमासाठी ४,४०२ जणांनी परीक्षा दिली. त्यातुलनेत टीव्ही अभ्यासक्रमाला कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मात्र, एफटीआयआयच्या संचालकांनी फिल्म अभ्यासक्रम हा मास्टर डिग्री समान असल्याचे स्पष्टीकरण  देत सारवासारव केली. 
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून देशातील प्रतिष्ठित अशा दोन संस्थांनी प्रथमच एकत्रितपणे सामायिक परीक्षा घेतली. या संयुक्तपणे होणाऱ्या प्रवेश परीक्षेविषयी जनजागृती व्हावी आणि मुलींचाही सहभाग वाढावा, यासाठी देशभरामधील विविध ठिकाणी चर्चासत्र घेण्यात आली. या प्रबोधनात्मक चर्चासत्रांमुळे दोन्ही संस्थांच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी उत्तम प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असताना अर्जाच्या संख्येत मात्र फारशी वाढ होऊ शकली नाही. दोन्ही संस्थांच्या प्रवेश परीक्षा शुल्कामध्ये करण्यात आलेली वाढ यामागचे कारण असल्याचे विद्यार्थ्यांकडून समोर येत आहे. 
गतवर्षीपर्यंत अर्जदारांना एफटीआयआयसाठीच्या टीव्ही आणि फिल्म दोन्हींकरिता  अर्ज करायचे म्हटले, तरी ३,५०० रुपये शुल्क, तर सत्यजित रे इन्स्टिट्यूटसाठी २००० रुपये शुल्क मोजावे लागत होते; पण यंदाच्या वर्षी फिल्म अभ्यासक्रमासाठीच्या शुल्कात ५०० रुपयांनी वाढ करून ४,००० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले. ज्यांना फिल्म आणि टीव्ही अशा दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अर्ज करायचा असेल, तर त्यांना ८,००० रुपये शुल्क भरावे लागणार होते. सामान्य विद्यार्थ्यांना हे शुल्क परवडणारे नसल्याने विद्यार्थ्यांनी फिल्म या एकाच अभ्यासक्रमाची निवड केली. 
एफटीआयआयच्या ११ आणि  सत्यजित रे इन्स्टिट्यूटच्या १२ अभ्यासक्रमांसाठी ४,४०२, तर टीव्ही अभ्यासक्रमाकरिता ८९१ अशा एकूण ५,२९३ जणांनी प्रवेश परीक्षा दिली. विशेष म्हणजे, प्रवेश परीक्षेसाठी २६ सेंटर ठरविण्यात आली होती; मात्र २०पेक्षा कमी अर्ज आल्याने त्यातील ५ सेंटर रद्द करण्याची वेळ आली. केवळ २१ सेंटरवर ही परीक्षा घेण्यात आली. 

प्रथमच अर्जदारांचा आकडा ५ हजारांवर
एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला म्हणाले, की एफटीआयआयच्या अनेक वर्षांच्या इतिहासात प्रथमच अर्जदारांचा आकडा ५,०००च्या वर गेला आहे. विद्यार्थ्यांना दोन स्वतंत्र संस्थेच्या परीक्षा द्याव्या न लागल्याने त्यांचा वेळ आणि पैसा वाचला आहे. असंतुलित गोष्टीमुळे काही निश्चित करण्यात आलेली सेंटर रद्द करावी लागली; मात्र अर्जदारांना दुसऱ्या सेंटरचा पर्याय देण्यात आला. यंदा प्रथमच श्रीनगर आणि पोर्ट ब्लेअर या सेंटरचा समावेश करण्यात आला होता. टीव्ही अभ्यासक्रमासाठी यंदाच्या वर्षी कमी संख्या आहे, असे काही नाही. फिल्म अभ्यासक्रम हा मास्टर डिग्रीच्या समान असल्याने फक्त त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

Web Title: increase fees & exam charges in FTII, Pune, Satyajit Ray Institute, kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.