महिलांमध्ये गर्भाशयाला होणाऱ्या फायब्रॉईडमध्ये वाढ

By Admin | Published: July 6, 2015 05:19 AM2015-07-06T05:19:47+5:302015-07-06T05:19:47+5:30

दिवसेंदिवस बदलत असणारी जीवनशैली आणि इतर कारणांमुळे महिलांमध्ये गर्भाशयाच्या पिशवीला होणाऱ्या विकारांचे प्रमाण वाढत आहे.

Increase in fibroids that occur in women in the womb | महिलांमध्ये गर्भाशयाला होणाऱ्या फायब्रॉईडमध्ये वाढ

महिलांमध्ये गर्भाशयाला होणाऱ्या फायब्रॉईडमध्ये वाढ

googlenewsNext

पुणे : दिवसेंदिवस बदलत असणारी जीवनशैली आणि इतर कारणांमुळे महिलांमध्ये गर्भाशयाच्या पिशवीला होणाऱ्या विकारांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये गर्भाशयाचा कॅन्सर हे गर्भपिशवी काढावी लागण्याचे पहिले महत्त्वाचे कारण असून, गर्भाशय पिशवीला येणाऱ्या फायब्रॉईडच्या गाठी हे दुसरे महत्त्वाचे कारण असल्याची माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैजयंती पटवर्धन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
त्या म्हणाल्या, की वयाच्या चाळिशीनंतर मासिक पाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असेल, पोट सहन न होण्याइतके दुखत असेल तर त्यावर गरजेनुसार उपचार केले जातात. तरीही हा आजार आटोक्यात आला नाही तर अगदी शेवटचा उपाय म्हणून गर्भाशयाची पिशवी काढण्याचा सल्ला दिला जातो. ही पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया सामान्य नसून, त्यात रुग्णाची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. परंतु शस्त्रक्रियेनंतर मात्र रुग्ण महिला अतिशय सामान्य जीवन जगू शकते.
आता आरोग्याबाबत जागरूकता वाढली असल्याने रुग्णांमध्ये एकूणच आजारांबाबतचे निदान वेळेत होते. त्यामुळे विशिष्ट समस्येवर वेळीच उपचार करणे शक्य होते. अन्यथा, पूर्वी मासिक पाळीमध्ये अतिरक्तस्राव होऊन महिलांमध्ये अ‍ॅनिमिया होण्याचे प्रमाण जास्त होते. तसेच हा त्रास कोणत्याही उपचाराविना सहन केला जात असे. आता त्याबाबत माहिती झाल्याने उपचारांसाठी महिला पुढे येताना दिसत आहेत आणि अशा प्रकारची जागृती आणखी वाढायला हवी, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. धनश्री शेणोलीकर म्हणाल्या.

गर्भाशय पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढले आहे असे चित्र आहे. याबाबत योग्य ती जागरूकता निर्माण झाल्यामुळे स्त्रियांचे जीवनमान सुसह्य होणार असेल तर डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार ही शस्त्रक्रिया करण्यात कोणतीही अडचण नाही. - डॉ. वैजयंती पटवर्धन, स्त्रीरोगतज्ज्ञ

कॅन्सर आणि फायब्रॉईडच्या गाठी होण्याचे नेमके आणि ठोस कारण सांगता येत नाही. तरीही फायब्रॉईड होण्यामागे लग्नाचे वाढते वय, पहिले मूल उशिरा होण्याचे वाढते प्रमाण आणि एक किंवा दोन ही अपत्यांची कमी असणारी संख्या ही कारणे प्रामुख्याने सांगता येऊ शकतात. याबरोबरच गर्भाशयाच्या पिशवीला सूज येणे आणि काही संसर्ग अशीही ही पिशवी काढावी लागण्याची वेगवेगळी कारणे सांगता येऊ शकतात.
- डॉ. धनश्री शेणोलीकर, स्त्रीरोगतज्ज्ञ

Web Title: Increase in fibroids that occur in women in the womb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.