मेट्रो मार्गाची छत्रपती संभाजी महाराज पुलावरील उंची वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:16 AM2021-09-04T04:16:15+5:302021-09-04T04:16:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: छत्रपती संभाजी महाराज पुलावरून (लकडी पूल) जाणाऱ्या मेट्रो मार्गाची उंची वाढवण्याची मागणी शहरातील काही गणेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: छत्रपती संभाजी महाराज पुलावरून (लकडी पूल) जाणाऱ्या मेट्रो मार्गाची उंची वाढवण्याची मागणी शहरातील काही गणेश मंडळांनी शुक्रवारी महामेट्रोकडे केली. विसर्जन मिरवणुकीत या मार्गाचा अडथळा येईल, असा दावा त्यांनी केला.
पुलावरील दोन्ही बाजूचे खांब तयार झाले असून, आता फक्त मधल्या सिमेंट काँक्रीटच्या पट्ट्या टाकण्याचे काम बाकी आहे. या मागणीने महामेट्रोपुढे मोठेच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
कोरोनामुळे विसर्जन मिरवणूक होणार नसली, तरी भविष्यात मिरवणूक होणारच आहे. त्यावेळी हा अडथळा येईलच, त्यामुळे आत्ताच त्यावर निर्णय होणे गरजेचे आहे, अशी आग्रही मागणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
मेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांना संकेत संजय मते, परेश खांडके, तुषार रायकर, आनंद दत्ताभाऊ सागरे, अभिजित वाळके, अक्षय ढमाले, कामठे, ॲड. निखिल मलानी व गौरव इनामदार यांनी याबाबतचे निवेदन दिले.
गाडगीळ यांनी त्यांना याबाबत वरिष्ठांबरोबर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. शहरातील सर्व आमदार खासदार महापालिका यांनाही निवेदन देणार असल्याची माहिती अक्षय ढमाले यांनी दिली.