सीएनजी दरामध्ये दीड रुपयांनी वाढ, आता पुणेकरांना प्रतिकिलोसाठी मोजावे लागणार ८५ रूपये!
By अविनाश रावसाहेब ढगे | Published: July 9, 2024 11:54 PM2024-07-09T23:54:23+5:302024-07-09T23:54:51+5:30
पुणे व पिंपरी चिंचवड, चाकण तळेगाव आणि हिंजवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्रीपासून दरवाढ लागू
अविनाश ढगे, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: पुणे व पिंपरी चिंचवड, चाकण तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील सीएनजीच्या दरामध्ये मंगळवारी (दि. ९) मध्यरात्रीपासून दीड रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) ने घेतला आहे. सीएनजी वाहन धारकांना आता प्रतिकिलोसाठी ८५ रूपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे वाहन धारकांच्या खिशाला काही प्रमाणात कात्री लागणार आहे.
सीएनजी गॅसची मागणी वाढत आहे. पण, स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग झाल्यामुळे सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. मागच्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या सीएनजीच्या दरात निवडणुका होताच वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. मागच्या वर्षी दोन ऑक्टोबर रोजी सीएनजीचे दर चार रुपयांनी वाढून ८७ वरून ९१ रूपये झाले होते. त्यानंतर पुन्हा एक रूपयांनी वाढ केली होती. त्यामुळे सीएनजीचे दर ९२ रुपयांवर गेले होते.
निवडणुकीच्या तोंडावर सहा मार्च रोजी सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २.५० रुपयांची कपात केली होती. आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. वाहनधारकांना मंगळवार (दि. ९) पर्यंत प्रतिकिलोसाठी ८३.५० रुपये मोजावे लागत होते. पण मंगळवारी (दि. ९) मध्यरात्रीपासून प्रतिकिलोसाठी ८५ रुपये मोजावे लागणार आहेत.