राज्यात गुन्हेगारीत वाढ! वेळ मागूनही मुख्यमंत्री वेळ देत नाहीत, सुप्रिया सुळेंची तक्रार
By राजू इनामदार | Updated: March 3, 2025 17:08 IST2025-03-03T17:07:04+5:302025-03-03T17:08:10+5:30
सरकारी माहितीच सांगते की, राज्यातील गुन्हेगारीत, त्यातही महिलांवरील अत्याचारात मागील काही महिन्यांमध्ये वाढ झालीये

राज्यात गुन्हेगारीत वाढ! वेळ मागूनही मुख्यमंत्री वेळ देत नाहीत, सुप्रिया सुळेंची तक्रार
पुणे: सरकारी माहितीच सांगते आहे. की राज्यातील गुन्हेगारीत, त्यातही महिलांवरील अत्याचारात मागील काही महिन्यांमध्ये वाढ झाली आहे. या व अन्य गोष्टींबाबत चर्चा करण्यासाठी वेळ मागूनही मुख्यमंत्री वेळ द्यायला तयार नाहीत अशी तक्रार खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. लाडकी बहिण योजना राबवणाऱ्यांकडूनच बहिणींचा अवमान करणारे वक्तव्य येत आहे असे त्या म्हणाल्या.
खासदार सुळे यांनी सोमवारी सकाळी स्वारगेट बस स्थानकाला भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रविंद्र माळगावकर व अन्य पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, बलात्कार प्रकरणाचा निषेधच आहे, पण घटना घडल्यावर ज्यापद्धतीने ती हाताळली गेली ते चुकीचे आहे. प्रकरण दडपण्याचा पोलिसांचा प्रयत्न दिसून येतो. घटनेनंतर आलेल्या प्रतिक्रियाही असंवेदनशील होत्या. आता आरोपी अटकेत आहे. जलदगती न्यायालयात खटला चालवून पिडितेला न्याय दिला पाहिजे. आरोपीला कठोर शिक्षा झाल्यावरच ते होईल.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या पीएस ओएसडीना जो चाप लावला तोच चाप मंत्र्यांनाही लावला पाहिजे असे खासदार सुळे म्हणाल्या. बीड जिल्ह्याची बदनामी दोन चार लोकांमुळे होत आहे. राज्यात नव्हे तर देशात बदनामी होत आहे. संशयित आरोपींना व्हिआयपी ट्रीटमेंटच्या बातम्या मी बघितल्या आहेत, मात्र एक खून माफ आहे सारखे सुरू आहे. यालाच आळा बसावा म्हणून मी मुख्यमंत्र्यांची भेट मागत आहे, मात्र ते वेळ देत नाहीत असे त्यांनी सांगितले.
क्रुषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि विविध प्रकारचे आरोप होत असलेले धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा की नाही तो प्रश्न त्यांच्या पक्षाचा आहे, मात्र सुनील केदार यांच्यावर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला. मग सुनील केदार यांना एक न्याय आणि माणिकराव कोकाटे यांना वेगळा न्याय कसा? असा प्रश्न सुळे यांनी केला.