Guillain Barre Syndrome: जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ; संख्या ५९ वरून ६७, काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 10:43 IST2025-01-24T10:38:19+5:302025-01-24T10:43:44+5:30
डेंग्यू, चिकुनगुनिया किंवा बॅक्टेरियासह इतर विषाणूंसारख्या संक्रमणांमुळे ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ आजार होण्याची शक्यता

Guillain Barre Syndrome: जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ; संख्या ५९ वरून ६७, काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
पुणे : पुण्यात ‘गुइलेन बॅरी सिंड्रोम’ (जीबीएस)च्या रुग्णांची संख्या ५९ वरून ६७ झाली आहे. महापालिका व आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांकडून या रुग्णांची माहिती मागवली असता विविध रुग्णालयात दाखल असलेल्या आणखी रुग्णांची संख्या समोर आली आहे. यापैकी सर्वाधिक रुग्णसंख्या ही ग्रामीण भागातील आहे.
पुणे मनपा व जिल्ह्यातील बाधित भागामध्ये सर्वेक्षण सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, रुग्णांचे नमुने ‘एनआयव्ही’कडे तपासणीला पाठवले असता त्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. तसेच शहराच्या विविध भागातील पाणी नमुने रासायनिक व जैविक तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.
खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना आव्हान करण्यात आले आहे की, जीबीएस रुग्ण आढळून आल्यास त्वरित शासकीय आरोग्य यंत्रणा यांना कळवावे, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’चे आजपर्यंत एकूण ६७ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ३९ रुग्ण पुणे ग्रामीण, १३ रुग्ण पुणे मनपा, १२ रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा व ३ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. यामध्ये ४३ पुरुष व २४ महिलांचा समावेश आहे, तर १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आजाराची सर्वसाधारण लक्षणे
- अचानक पायातील किंवा हातात येणारा अशक्तपणा.
- अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा.
- अनेक दिवसांपासून डायरियाचा त्रास.
काय काळजी घ्याल
- पाणी उकळून गार केलेले वापरा.
- ऑफिसमध्ये वगैरे जातानादेखील घरचे पाणीच आठवणीने घेऊन जा.
- फळे, पालेभाज्या नीट धुवून मगच वापरा.
- बाहेर खाणे टाळा.
- घरच्या घरी ताजे अन्न घ्या.
- वैयक्तिक स्वच्छता पाळा.
नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही
‘कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी’ या संसर्गामुळे सध्या ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ची रुग्ण आढळून येत आहेत. हा संसर्ग दूषित अन्न किंवा पाणी प्यायल्याने होत असून, काही व्यक्तींमध्ये, बॅक्टेरिया रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतो. त्याचप्रामाणे डेंग्यू, चिकुनगुनिया किंवा बॅक्टेरियासह इतर विषाणूंसारख्या संक्रमणांमुळे ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ आजार होण्याची शक्यता आहे. पण याचे प्रमाणदेखील लाखात १ रुग्ण असे आहे. मात्र सध्या पुण्यात संसर्गामुळे या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, सुरुवातीच्या ४ आठवड्यात रुग्णांना लक्षणे जाणवतात. हा आजार बरा होणारा असून, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. यामध्ये स्वत:ची काळजी घेणे आवश्यक असल्याचे वरिष्ठ साथरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप आवटे यांनी यावेळी सांगितले.