Swine Flu: पुण्यात 'स्वाईन फ्लू' च्या रुग्णांमध्ये वाढ; जुलै महिन्यात २६ जणांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 07:25 PM2022-07-26T19:25:54+5:302022-07-26T19:45:33+5:30
१ ते जुलै २६ पर्यंत यापैकी सर्वाधिक म्हणजे २२ रुग्ण आढळून आले आहेत
पुणे : पावसाळा जसा सुरू होतो तसं अनेक विषाणूजन्य आजार पसरतात. यावेळी श्वसनाच्या आजारांना कारणीभूत ठरतील असे विषाणू विशेष करून सक्रीय झाले आहेत. त्यामुळे स्वाईन फ्लू आणि डेंग्यू आजाराचे रुग्ण संख्येत वाढ झालेली दिसत आहे. तेव्हा पुण्यात सध्या असे आजार किती प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्यावर पुणे महापालिकेकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत याचा आढावा 'लोकमत' ने पुणे पालिका आरोग्य विभागात जाऊन घेतला.
पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य अधिक डॉ. संजय वावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. जुलै १ पासून ते जुलै २६ पर्यंत स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत विशेषत्वाने वाढ झालेली आहे. १ जानेवारी २०२२ पासून ते आतापर्यंत स्वाईन फ्लूचे तब्बल ४५ रुग्ण आढळले आहेत. मात्र १ पासून ते जुलै २६ पर्यंत यांपैकी सर्वाधिक म्हणजे २२ रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात असा कोणता विशेष भाग नाही जिथे जास्त रुग्ण संख्या आहे. स्वाईन फ्लू चे रुग्ण पुण्यात विखुरलेले आहेत."
पुणे प्रशासनाने स्वाईन फ्लू प्रतिबंधक उपाय केले असल्याचंही वावरे म्हणालेत. "कोविड साठी जसा स्वॅप चा वापर केला गेला तसाच वापर स्वाईन फ्लू च्यावेळी केला जावा अशी सोय एन आय व्ही किंवा ससून मध्ये करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर किंवा इमारती स्तरावर जनजागृती करण्याचं काम पुणे पालिककडून करण्यात येतंय. मास्कचा वापर लोकांनी करणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणतेही श्वसनाचे आजार होणार नाहीत. स्वाईन फ्लू करिता आपल्याकडे खासगी रुग्णालय आणि सरकारी रुग्णालयात लस उपलब्ध आहेत. जे लोक वयाने जास्त आहेत किंवा ज्यांना शारीरिक आजारपण आहे त्यांनी स्वाईन फ्लू ची लस नक्की घ्यावी."
स्वाईन फ्लूची लक्षणं कोणती?
ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, अशक्तपणा.
डेंग्यू ची लक्षणं कोणती?
जास्त ताप, शरीरात खूप वेदना, स्नायू दुखी, डोकेदुखी, डोळ्याच्या खुपनीमध्ये दुखणे, पोटात दुखणे, उलटी, मळमळ होणे, अंगावर चट्टे येणे.