बिबवेवाडी, वानवडी, हडपसर परिसरात दुचाकीस्वारांकडून मोबाईल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:13 AM2021-09-04T04:13:57+5:302021-09-04T04:13:57+5:30
पुणे : शहरात दुचाकीस्वार चोरटे मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले असून, पादचाऱ्यांना विचारपूस करण्याच्या बहाण्याने मोबाईल हिसकावण्याच्या घटना वाढल्या ...
पुणे : शहरात दुचाकीस्वार चोरटे मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले असून, पादचाऱ्यांना विचारपूस करण्याच्या बहाण्याने मोबाईल हिसकावण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टेम्पो चालक तरूणासह दोन महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावण्याच्या तीन घटना समोर आल्या आहेत.
एका टेम्पो चालविणाऱ्या तरुणाला अडवून ’तुझे वय आहे का वाहन चालवायचे? असे विचारत दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांचा १५ हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना दि. ३१ आॅगस्टला दुपारी अडीचच्या सुमारास बिबवेवाडीतील शेळके वस्ती परिसरात घडली. याप्रकरणी तरुणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुसरी घटना २२ आॅगस्टला रात्री दहाच्या सुमारास हडपसरमधील दत्त मंदिर कॉर्नर परिसरात घडली. रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या हातातील १० हजारांचा मोबाईल हिसकावून नेण्यात आला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जाधव तपास करीत आहेत.
नातेवाईकाकडे चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्याकडील ५ हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना २४ आॅगस्टला संध्याकाळी ४.३० च्या सुमारास हडपसरमधील हांडेवाडी रस्त्यावरील श्रीराम चौकाजवळ घडली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक उमेश कदम तपास करीत आहेत. दरम्यान, मोबाइल हिसकाविण्याच्या घटनांमुळे महिलांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. बहुतांश घटनांमध्ये दुचाकीस्वार चोरट्यांकडून महिलांना लक्ष्य केले जात असल्याचे दिसून आले आहे.