व्यंगचित्रकलेची साक्षरता वाढीस लागावी - चारु हास पंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 03:27 AM2018-05-05T03:27:53+5:302018-05-05T03:27:53+5:30
व्यंगचित्रकलेबाबतची कलाप्रेमींची साक्षरता हाही महतत्वाचा मुद्दा ठरतो. समाजात चित्रपट, साहित्य, नृत्य, गायन यांबाबत सजगता निर्माण झाली आहे; मात्र अद्याप चित्रसाक्षरता निर्माण झालेली नाही. चित्रकलेच्या तुलनेत व्यंगचित्रकलेची साक्षरता अजिबातच रुजलेली नाही. व्यंगचित्र साक्षरता वाढविल्यास व्यंगचित्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रगल्भ होऊ शकतो. मुलांवर व्यंगचित्रकलेचे संस्कार शालेय स्तरापासून व्हायला हवेत. त्यातून स्वच्छता, सौंदर्यदृष्टी याबाबतची अनास्था दूर होऊन संवेदनशीलता वाढीस लागेल, असे मत चारुहास पंडित यांनी जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त व्यक्त केले.
व्यंगचित्रकलेची सध्याची स्थिती सकारात्मक आहे. जिल्हा वर्तमानपत्रे, नियतकालिकांमध्ये व्यंगचित्रांना स्थान मिळू लागले आहे. मात्र, मोठ्या वर्तमानपत्रांमध्ये व्यंगचित्रांची जागा आक्रसलेली आहे. पॉकेट कार्टून, राजकीय व्यंगचित्रे हे प्रकार खूप कमी झाले आहेत. माध्यमांनी पुढाकार घेऊन व्यंगचित्रांचा सुकाळ परत आणणे, ही काळाची गरज बनली आहे. काळाच्या ओघात व्यंगचित्रांचा दर्जा सुधारत आहे. विविध विषय हाताळले जात आहेत. मात्र, सध्या चांगल्या व्यंगचित्रकारांना अॅनिमेशन क्षेत्र आपलेसे करते. आर्थिकदृष्ट्या जास्त मोबदला मिळत असल्याने व्यंगचित्रकार या क्षेत्राकडे वळताना दिसतात. त्यामुळे कागदावर व्यंगचित्र रेखाटणाऱ्या व्यंगचित्रकारांची संख्या कमी झाली आहे. माध्यमांनीच चांगल्या आणि दर्जेदार व्यंगचित्रकारांचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
तरुणांची या क्षेत्रातील संख्या समाधानकारक दिसत असली, तरी राजकीय आणि सामाजिक समज असणारे व्यंगचित्रकार फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. उत्तम व्यंगचित्रकार असले, तरी त्यांची समज उच्च दर्जाची असेलच, असे नाही. बºयाचदा, सामाजिक, राजकीय स्थितीवर नेमकेपणाने भाष्य करण्याची त्यांची क्षमता कमी पडते. सध्या व्यंगचित्रकार सोशल मीडियावर चांगल्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. लोकांपर्यंत आपली कला पोहोचविण्याचे सशक्त व्यासपीठ त्यांच्यासाठी उपलब्ध झाले आहे. व्यंगचित्रांना लोकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळतात, कामाची पोचपावती मिळते; मात्र आर्थिकदृष्ट्या या माध्यमाचा फारसा उपयोग होत नाही.
व्यंगचित्र म्हणजे केवळ राजकीय चित्रे नसतात. त्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन अशा विविध विषयांना स्पर्श केला जातो. व्यंगचित्रकलेची व्याप्ती समजून घेताना आधी शालेय स्तरावर चित्रकला चांगल्या पद्धतीने शिकवली गेली पाहिजे. त्यातूनच व्यंगचित्रकला उपजू शकते. चित्रकला हा व्यंगचित्रकलेचा पाया असतो. पाया मजबूत झाला, तर कलेचे पुढील टप्पे गाठणे सोपे होऊ शकते.
व्यंगचित्रकले- बाबतची कलाप्रेमींची साक्षरता हाही महत्त्वाचा मुद्दा ठरतो. समाजात चित्रपट, साहित्य, नृत्य, गायन यांबाबत सजगता निर्माण झाली आहे; मात्र अद्याप चित्रसाक्षरता निर्माण झालेली नाही. चित्रकलेच्या तुलनेत व्यंगचित्रकलेची साक्षरता अजिबातच रुजलेली नाही. व्यंगचित्र साक्षरता वाढविल्यास व्यंगचित्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रगल्भ होऊ शकतो. व्यंगचित्रामागील कल्पना, व्यंगचित्रकाराचा विचार, मांडणी याबाबतची प्रक्रिया कलाप्रेमींपर्यंत पोहोचल्यास त्यांना गाभा समजून घेता येऊ शकतो. प्रदर्शने, प्रात्यक्षिके, कार्यशाळा आदी माध्यमांतून कलाकार आणि कलाप्रेमी यांच्यातील संवाद वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. मुलांवर व्यंगचित्रकलेचे संस्कार शालेय स्तरापासून व्हायला हवेत. त्यातून स्वच्छता, सौंदर्यदृष्टी, याबाबतची अनास्था दूर होऊन संवेदनशीलता वाढीस लागेल. अनेक शाळांमध्ये चित्रकला या विषयासाठी शिक्षकही उपलब्ध नाहीत. शासनातर्फे कलेच्या माध्यमातून ठोस धोरण राबविले जाण्याची आवश्यकता आहे. व्यंगचित्रे हे व्यक्त होण्याचे उत्तम माध्यम आहे. कमी रेषांमध्ये प्रभावीपणे व्यक्त होता येते. संवादाचे माध्यम म्हणून शालेय वयापासून व्यंगचित्रकलेचे संस्कार झाल्यास कलेच्या प्रांतात देशाची प्रगती होऊ शकेल. अन्यथा, सौैंदर्यदृष्टी नसलेल्या इमारती उभारण्याचेच काम होत राहील. त्यासाठी व्यंगचित्रकला ही कला अभ्यासक्रमाचा भाग होण्याच्या दिशेने प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी, आर्ट स्कूलमध्ये कलेचे सर्व विषय सखोलपणे शिकवायला हवेत.