शहरातील मोकाट श्वानांच्या संख्येत वाढ
By admin | Published: July 30, 2016 05:09 AM2016-07-30T05:09:48+5:302016-07-30T05:09:48+5:30
महापालिकेला शहरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याने श्वानदंश झाल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सन २०१५ मध्ये अशा तब्बल १८ हजार ५६७ घटना
पुणे : महापालिकेला शहरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याने श्वानदंश झाल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सन २०१५ मध्ये अशा तब्बल १८ हजार ५६७ घटना घडल्या आहेत. पालिकेच्या पर्यावरण विभागाने सर्वसाधारण सभेत शुक्रवारी सादर केलेल्या पर्यावरण अहवालात ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.
भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी पालिकेकडे स्वतंत्र यंत्रणा आहे. खासगी संस्थांकडूनही हे काम करून घेण्यात येते, मात्र त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे या अहवालावरून दिसते आहे. क्षेत्रीय कार्यालयांवर त्यांच्या हद्दीतील अशा मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे, मात्र अशी कुत्री पकडणाऱ्या गाड्या दिवसा फिरत असतात. त्यांना ही कुत्री सापडत नाहीत.
रात्री मात्र गल्लीबोळात कचऱ्याच्या ठिकाणी ती मोकाट फिरत असतात. कुत्री चावल्याच्या बहुसंंख्य घटनाही रात्रीच घडलेल्या आहेत. त्यातही वाहन चालवणाऱ्यांनाच ती चावत असल्याचे दिसते आहे.
पर्यावरण अहवाल सादर करण्यासाठी आयोजित या विशेष सर्वसाधारण सभेला आयुक्तांसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित नसल्याबद्दल विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. नंतर आयुक्त व विभागप्रमुखही सभेत उपस्थित झाले.