जलपर्णीमुळे डासांच्या संख्येत वाढ ; पुणेकर हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 07:20 PM2019-04-25T19:20:28+5:302019-04-25T19:21:50+5:30
गेल्या काही दिवसांपासून डासांच्या उच्छादामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. मुळा - मुठा नदीपात्रामध्ये माेठ्याप्रमाणावर जलपर्णी वाढल्याने डासांची माेठ्याप्रमाणावर उत्पत्ती हाेत आहे.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून डासांमुळे पुणेकर हैराण झाले आहेत. मुळा - मुठा नदीपात्रामध्ये जलपर्णी वाढल्याने डासांची माेठ्याप्रमाणावर उत्पत्ती हाेत आहे. परंतु ही जलपर्णी काढण्यासाठी पालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने डासांच्या प्रादुर्भावामुळे पुणेकर हैराण झाले आहेत.
एकीकडे पुण्याच्या तापमानाने चाळीशी पार केलेली असताना दुसरीकडे शहरात डासांचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे. संध्याकाळच्या वेळी माेठ्याप्रमाणावर डास नागरिकांच्या घरात येत असल्याने पुणेकर हैराण झाले आहेत. त्याचबराेबर संध्याकाळच्या वेळी लहानमुले देखील खेळण्याकरीता बाहेर पडत असल्याने त्यांच्या आराेग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
डासांमुळे मलेरिया, डेंग्यु, चिकुनगुनिया यांसारखे आजार हाेऊ शकतात. यावर याेग्य उपचार न मिळाल्यास रुग्णाचा जीव देखील जाऊ शकताे. सध्या पुण्यातील मुळा- मुठा या नद्यांमध्ये माेठ्याप्रमाणावर जलपर्णी वाढली आहे. जलपर्णी डासांच्या उत्पत्तीस पाेषक असल्याने डासांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे नदी किनारी राहणाऱ्या तसेच शहरातील इतर भागांमधील नागरिकांना सध्या डासांच्या त्रासाला सामाेरे जावे लागत आहे.
याबाबत पुणे महानगरपालिकेचे आराेग्य अधिकारी डाॅ. संजीव वावरे म्हणाले, प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात उपलब्ध असलेल्या मनुष्यबळानुसार जलपर्णी काढण्याचे काम करण्यात येत आहे. सध्या पालिकेकडे 45 टक्के कर्मचारी कमी आहेत. त्यातच आचारसंहिता असल्याने काॅन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून जलपर्णी काढण्याचे काम करण्यास बंधने आहेत. तरीही पालिकेकडून जलपर्णी काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.