महसूल वाढीसाठी करदात्यांची संख्या वाढवा : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 06:54 PM2018-04-26T18:54:58+5:302018-04-26T18:54:58+5:30
राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने उद्दीष्टापेक्षा जास्त महसूल गोळा केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला.
पुणे: राज्य कर्जबाजारी झाले असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये छापून येत असले तरी राज्य शासनाची कर्ज फेडण्याची क्षमता आहे. परंतु,कर्ज काढून राज्याचा विकास करणे हा उपाय नाही. राज्याचा महसूल चांगला असला तरी त्यात वाढ झाली पाहिजे. राज्याकडून कर भरपूर आकारला जातो, मात्र, महसूल वाढीसाठी राज्यातील करदात्यांची संख्या वाढवावी लागेल, असे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी व्यक्त केले.
राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने उद्दीष्टापेक्षा जास्त महसूल गोळा केल्याबद्दल पाटील यांच्या हस्ते विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होते. याप्रसंगी राज्याचे मुद्रांक व नोंदणी महानिरिक्षक अनिल कवडे, सहसचिव श्यामसुंदर पाटील, नैना बोंदाडे, सुरेश जाधव आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, राज्य शासनाने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला यंदा २१ हजार कोटींचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, विभागाने उद्दिष्टापेक्षा ५ हजार ५०० कोटींचा जादा महसूल गोळा केला. विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने एकूण २६ हजार ५०० कोटींचा महसूल गोळा केला. राज्य, जिल्ह्यातील दुष्काळ निवारण करण्यासाठी, बोंड आळीमुळे झालेले शेतक-यांचे नुकसान देण्यासाठी तसेच रस्ते बांधणी अशा विविध कामांसाठी हा महसूल उपयोगी पडणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाचे सर्व काम आॅनलाईन पद्धतीने केले जाते. त्यामुळे सर्व कार्यालय कॅशलेस झाले आहे.तरीही कार्यालयात कॅश कशी येते? जास्त कमाईसाठी जास्त कष्ट करा,परंतु,कार्यालयीन कामकाजात गडबड करू नका,असा सल्लाही पाटील यांनी यावेळी दिला.
दरम्यान, नोंदणी व मुद्रांक विभागात मनुष्यबळाची कमतरता, रिक्त पदे, पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित आहे, असे काही अधिका-यांनी चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर विभागाचे प्रश्न सोडविण्यासाठी येत्या दहा दिवसात स्वतंत्र बैठक घेतली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.