मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पास करण्याच्या प्रमाणात वाढ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:13 AM2021-04-30T04:13:47+5:302021-04-30T04:13:47+5:30
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेस निवड करण्याच्या प्रमाणात वाढ करावी, ...
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेस निवड करण्याच्या प्रमाणात वाढ करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा ही चाळणी परीक्षा समजली जाते. या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता येते. एका जागेसाठी १४ उमेदवारांची निवड केली जाते. त्यामुळे अनेकांना अवघा एक गुण जरी कमी पडला तरी मुख्य परीक्षा देता येत नाही. पासिंगचे प्रमाण हे एकास चौदा किंवा कधी कधी वाढविलेदेखील जाते. यावर विचार करून एका जागेसाठी १४ ऐवजी २५ उमेदवारांची निवड करावी. एमपीएसीने परीक्षा देण्यावर प्रवर्गानुसार मर्यादांचे बंधन घातले आहे. त्यामुळे परीक्षा देण्यावर आता मर्यादा आल्या आहेत. मुख्य परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
चौकट
१:१४ ऐवजी १:२५ प्रमाण केल्यास अनेकांना संधी
केंद्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये १:२५ या प्रमाणात निवड केली जाते. एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा, संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब आणि क आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा आदी परीक्षांसाठी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १:१४ ऐवजी १:२५ केले, तर अधिक संधी मिळू शकते.
कोट
वयोमर्यादा वाढविणे हा जसा पर्याय आहे, त्याचप्रमाणे पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी देणे त्यापेक्षा उत्तम पर्याय आहे. प्रमाणात वाढ केली तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. तसेच मानसिकता बदलेल.
- सुवर्णा पगार, परीक्षार्थी
कोट
मेहनती विद्यार्थ्यांचे केवळ काही पॉइंट्सच्या फरकामुळे वर्ष वाया जाते. मागील दोन वर्षांत पहिल्यांदाच परीक्षा होत आहे. त्यामुळे वय वाढलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता सरकारने मुख्य परीक्षेचे प्रमाण हे १:२५ करावे.
-अविनाश शेंबटवाड, परीक्षार्थी