टेकड्यांसह संवेदनशील ठिकाणांवरची गस्त वाढवणार
By admin | Published: February 28, 2016 03:50 AM2016-02-28T03:50:37+5:302016-02-28T03:50:37+5:30
शहरातील टेकड्यांसह महिलांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणांवर गस्त वाढवण्यात येणार असून, याबाबतीत कायम ‘अॅलर्ट’ राहण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना
पुणे : शहरातील टेकड्यांसह महिलांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणांवर गस्त वाढवण्यात येणार असून, याबाबतीत कायम ‘अॅलर्ट’ राहण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना दिल्याचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी सांगितले. हनुमान टेकडीवर पुस्तक वाचण्यासाठी गेलेल्या तरुणीवर चोरट्याने केलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर शहरातील टेकड्यांवरील सुरक्षेचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत’च्या सविस्तर वृत्ताची दखल पोलीस आयुक्तांनी घेतली असून,याभागात ‘महिला मार्शल्स’ची संख्या वाढवण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
हनुमान टेकडीवर बुधवारी संध्याकाळी पुस्तक वाचण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीला लुटण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलिसांनी विजय विकास कांबळे (वय २१, रा. वडारवाडी) याला अटक केली आहे. या घटनेच्या निमित्ताने शहरातील टेकड्यांवर जाणाऱ्या महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षेबाबतची सद्य:स्थिती आणि महिला सुरक्षा समितीच्या अहवालाकडे करण्यात येणाऱ्या दुर्लक्षाबाबत ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता. ‘लोकमत’च्या टीमने शुक्रवारी काही टेकड्यांवर फिरून सुरक्षेचा आढावाही घेतला. यासोबतच महिला, तरुणी आणि नागरिकांमध्ये स्वत:च्याच सुरक्षेबाबत असलेली उदासीनताही समोर मांडली.
या वृत्ताची दखल पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी घेतली आहे. टेकड्यांवर, तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे. यासोबतच पोलिसांना अशा घटनांबाबत कायम ‘अॅलर्ट’ राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी काळात महिला पोलिसांची गस्त वाढवण्यावर भर देण्यात येणार असून, त्यांच्यासाठी वाहनांनी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. महिला आणि तरुणींनीही निर्जनस्थळी जाताना सुरक्षेचा विचार करावा. स्वत:ला धोका होईल अथवा इजा पोहोचेल, अशा ठिकाणी जाणे टाळावे.
जर शंकास्पद काही वाटलेच तर पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांना अवश्य मदत पुरवली जाईल, असा वडीलकीचा सल्लाही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
टेकड्यांची सुरक्षा ही केवळ पोलिसांचीच जबाबदारी नाही. वन विभागानेही यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. महिला सुरक्षा समितीमध्ये पोलिसांसह महापालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधीही आहेत. सुरक्षेचा मुद्दा आला, की केवळ पोलिसांकडे बोट दाखवून चालणार नाही. उर्वरित विभागांनीही त्यांची जबाबदारी ओळखून उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. कारण पोलीस सुरक्षेसाठी असले, तरी बाकी सर्व महत्त्वाच्या उपाययोजना उर्वरित विभागांनाच कराव्या लागणार आहेत.