पोलीस-नागरिक सलोखा वाढावा
By admin | Published: May 7, 2017 02:49 AM2017-05-07T02:49:20+5:302017-05-07T02:49:20+5:30
मावळ तालुक्यात मागील काही महिन्यांपासून वाढलेली गुन्हेगारी व भयावह गुन्हे घडून देखील त्यांची न होणारी उकल हे पोलिसांचे
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : मावळ तालुक्यात मागील काही महिन्यांपासून वाढलेली गुन्हेगारी व भयावह गुन्हे घडून देखील त्यांची न होणारी उकल हे पोलिसांचे जनमाणसातील सलोख्याचे संबंध कमी झाले असल्याचे धोतक म्हणावे लागेल. म्हणून पोलिसांनी नागरिकांशी सलोख्याचे संबंध राखा, असे म्हणण्याची वेळ आली
आहे.
पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्यामुळे मावळ तालुक्यासारख्या संत-महंतांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या भूमीत खून, दरोडे, जबरीचोरी, घरफोडी, महिला अत्याचार सारख्या घटना वाढू लागल्या आहेत.
दिवसा ढवळ्या या घटना घडत असताना पोलिसांना या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी काहीही धागेदोरे हाती लागत नाही. महिनोनमहिने आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाहीत. नागरिकही पोलिसांना घटनांची माहिती देण्यासाठी धजावत नाहीत हे पोलिसांची जनमाणसातील प्रतिमा खालावल्याचे उघडे सत्य आहे. जसा पोलीस हा खाकी वर्दीतील माणूस आहे तसाच माणूस हादेखील साध्या वेशातील पोलीस आहे हे साधे समीकरण पोलिसवाले विसरले आहेत.
सध्या बहुतांश गुन्ह्यांची उकल ही सीसीटीव्ही कॅमेरे व मोबाईल लोकेशनवर केली जाते. मात्र, ज्या ठिकाणी या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे, असे गुन्हे महिनोनमहिने पडून आहेत. ना आरोपींचा शोध लागतो, ना नागरिकांना न्याय भेटतो. ज्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे व मोबाईल नव्हते अथवा त्यातील अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी विकसित झालेली नव्हती. तेव्हा हेच साध्या वेशातील पोलीस हे कायद्याचे नाक, कान व डोळे होते. आता सर्वच पोलीस ठाण्यांची परिस्थिती बदलली आहे.
पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेगारांना सन्मानाची वागणूक व सर्वसामान्यांना गुन्हेगारांची वागणूक दिली जाते. किरकोळ प्रथमदर्शनी गुन्हे मिटत असताना नागरिकांना त्रास दिला जातो. अनेकवेळा गुन्हा केलेला नसतानाही खऱ्या गुन्हेगाराची मर्जी सांभाळण्यासाठी सर्वसामान्यांचा बळी दिला जात असल्याने सर्वसामान्य नागरिक पोलीस ठाण्याची पायरी चढण्यासही धजावत नाहीत. नागरिकांच्या मनातील पोलिसांबाबतची नकारात्मक प्रतिमा बदलण्याची गरज आहे.
पोलिसांचा नाहक ससेमिरा मागे नको, म्हणून नागरिक देखील एखादी घटना माहीत असूनही पोलिसांना सांगत नाही. कारण पोलिसांची समाजमनातील विश्वासार्हता कमी झाली आहे. पोलिसांनी समाजाभिमुख काम केल्यास समाजही नक्कीच पोलिसांभिमुख काम करेल यामध्ये तीळमात्र शंका नाही.
एखादी मोठी घटना घडल्यानंतर संबंधित परिसरातील नागरिकांना एकत्र बोलावून समज देण्याची वेगळी प्रथा सध्या अनेक पोलीस ठाण्यांमध्ये पहायला मिळत आहे. खरे तर पोलिसांनी नागरिकांसोबत सलोख्यांचे संबंध प्रस्तापित करून स्वत:चे माहितीचे स्रोत वाढविल्यास वाढत्या गुन्हेगारीला नक्कीच आळा बसेल. साध्या वेशातील पोलिसांचा नाक,कान व डोळे म्हणून उपयोग केल्यास गुन्ह्यांची उकलही तत्काळ होईल, असा आशावाद जाणकार व्यक्त करीत आहेत.