महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:10 AM2021-07-01T04:10:09+5:302021-07-01T04:10:09+5:30
पुणे : महिलेस लग्नाचे आमिष दाखवून ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच्या पोलीस कोठडीत ...
पुणे : महिलेस लग्नाचे आमिष दाखवून ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश डी. ए. अरगडे यांनी हा आदेश दिला.
रोनित डी. कपूर उर्फ संदीप दादाराव वायभासे (वय ३४, रा. वडगाव शेरी, मूळ बोरखेडी, ता. रिसोड, जि. वाशिम) असे कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ३१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१७ ते डिसेंबर २०२० या कालावधीत हा प्रकार घडला.
आरोपी वायभासे याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर बिटक्वाईनमध्ये गुंतवणूक करणे, सिंगापूर येथे नोकरी मिळविणे यासाठी फिर्यादीचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापर करीत ११ लाख रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केली. त्यानंतर घेतलेले पैसे परत करणार नसल्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
आरोपीने बिटक्वाईनमध्ये पैसे गुंतवायचे आहे असे कारण देत फिर्यादींना कर्ज काढण्यास भाग पाडले. त्याने त्या रकमेचा वापर कशासाठी केला याचा तपास करणे, विविध खासगी बँकामधून फिर्यादी महिलेच्या नावे वैयक्तिक कर्ज काढण्यास प्रवृत्त करून फसवणूक केली आहे त्याचा तपास करण्यासाठी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी अशी मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.
-----------------