हनुमंत नाझीरकर यांच्या अपसंपदा गुन्ह्यातील सहआरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:12 AM2021-04-02T04:12:27+5:302021-04-02T04:12:27+5:30
पुणे : नगर रचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा धारण केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ...
पुणे : नगर रचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा धारण केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यातील सहआरोपीच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने ७ एप्रिलपर्यंत वाढ केली.
राहुल शिवाजी खोमणे (वय ३१, रा. शिरवली, ता़ बारामती) असे सहआरोपीचे नाव आहे. राहुल खोमणे हा हनुमंत नाझीरकर यांच्या सख्या चुलत भावाचा मुलगा आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अंलकार पोलीस ठाण्यात हनुमंत नाझीरकर यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
राहुल खोमणे याने तयार केलेल्या बनावट करारनाम्यांपैकी ३५ करारनामे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हस्तगत केले आहेत. तसेच या व्यतिरिक्त ३४६ कृषी पावत्या जप्त करावयाच्या आहेत. राहुल खोमणे याच्या वैयक्तिक बँक खात्यावर ८७ लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत. गितांजली ब्रिडर्स कंपनीत गुंतविलेले २३ लाख रुपयांची गुंतवणुक ही त्यांच्या उत्पन्नापेक्षा प्रचंड जास्त प्रमाणात आहे. राहुल खोमणे याच्या नावे आणखी कोणकोणत्या बँकेचे कर्ज घेऊन त्यानंतर ते नाझीरकर कुटुंबीय भागीदार असलेल्या कंपन्यांकडे वळविण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास करायचा आहे.
पोलीस कोठडीत असलेला मुख्य आरोपी हनुमंत नाझीरकर आणि राहुल खोमणे या दोघांची समोरासमोर बसून चौकशी करुन तपास करायचा आहे. तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे यांनी सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांच्यामार्फत पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने ती विनंती मान्य करुन राहुल खोमणे याच्या पोलीस कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
याच गुन्ह्यात हनुमंत नाझीरकर यालाही बुधवारी न्यायालयाने ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे अधिक तपास करीत आहेत.