पिंपरीत एकजुटीने काम करत राष्ट्रवादीची ताकद वाढवा : चित्रा वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 07:43 PM2018-05-07T19:43:40+5:302018-05-07T19:43:40+5:30
आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र काम करणे अपेक्षित आहे.
पिंपरी : लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीतील सर्व आघाड्यांनी तसेच महिला आघाडीने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, पक्षाची ताकद वाढविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले. पुण्यातून राज्यसभेच्या खासदारपदी वंदना चव्हाण यांची दुस-यांदा बिनविरोध निवड झाली. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर जिल्हा महिला आघाडीच्या वतीने चव्हाण यांचा वाघ यांच्या हस्ते चिंचवड येथे जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी महापौर अनिता फरांदे व ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम, अपर्णा डोके आदी उपस्थित होते.
खासदार चव्हाण म्हणाल्या, महिला आर्थिकदृष्टया स्वावलंबी झाली की घरातुनसुध्दा हळुहळु मदत मिळू लागते. त्यासाठी महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. अनेक महिला शासकीय सेवेत किंवा राजकीय क्षेत्रात उच्चपदावर पाहायला मिळतात. कुटुंबियांचा तसेच पवार साहेबांची दुरदृष्टी आणि पाठिंब्यामुळे मला राजकारणात येण्याची संधी मिळाली.
वैशाली काळभोर म्हणाल्या, महापालिका निवडणुकीत फसवी जाहिरात करून भाजपने सत्ता काबीज केली. केंद्र- राज्यातील भाजप सरकारच्या चार वर्षांच्या कालावधीत महागाई, भ्रष्टाचार, जातीयवाद बोकाळला आहे. शहरातील नागरिकांनादेखील आता आपली 'भूल' कळली आहे. शहराध्यक्ष वाघेरे म्हणाले, स्माईल प्रकल्पाप्रमाणे पिंपरी चिंचवडमधील महिलादेखील झोपडपट्टीतील महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहेत.
सूत्रसंचालन शिल्पा बिडकर आणि आभार मनिषा गटकळ यांनी मानले.
-------------------