राजगड कारखान्याची उत्पादन क्षमता वाढविणार- आमदार संग्राम थोपटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 03:05 PM2021-09-28T15:05:38+5:302021-09-28T15:14:47+5:30
शासनाच्या निर्देशानुसार कारखान्याच्या शेअर्सची किंमत १० हजारांवरून १५ हजार रुपये करण्यासाठी कारखाना पोटनियमात दुरुस्ती करण्याचा ठराव संमत करण्यात आला
नसरापूर (पुणे): "१५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्यास शासनाने परवानगी दिल्याने गाळपासाठी जास्तीचा कालावधी मिळाल्याने गाळप क्षमता १ हजार २५० टनांवरून ३ हजार ५०० टन करण्यात येत आहे. त्यामूळे या वर्षी ३ लाख मेट्रिक टन गाळप उद्दिष्ट साध्य होईल. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष व आमदार संग्राम थोपटे यांनी ३१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. राजगड सहकारी कारखान्याची ३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने छत्रपती शिवाजीराजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग धांगवडी (ता. भोर) येथे पार पडली. त्यावेळी थोपटे यांनी माहिती दिली.
शासनाच्या निर्देशानुसार कारखान्याच्या शेअर्सची किंमत १० हजारांवरून १५ हजार रुपये करण्यासाठी कारखाना पोटनियमात दुरुस्ती करण्याचा ठराव संमत करण्यात आला. यावेळी सभासद ठेव योजना, भाग भांडवल वाढ, साखर वाटप, ऊस लागवडी, ऊस दर तफावत, ऊस तोडणी वेळेवर व्हावी, याबाबत सभासद आबासाहेब यादव, अशोक पांगारे, राजेंद्र मोरे, बाळासाहेब गरुड, सचिन बाठे यांनी विचारलेल्या प्रश्नांना कारखाना अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी उत्तरे दिली. सालाबादप्रमाणे सभासदांना वाटप करताना साखरेचे प्रमाण वाढवावे, कारखाना कामगार व ऊस तोडणी कामगारांची तपासणी करण्यात येऊन त्यांचे लसीकरण करावे, अशा मागण्या केल्या. त्यावर अध्यक्ष थोपटे यांनी कामगारांचे लसीकरण झाले असून, येणाऱ्या ऊस तोड कामगारांची तपासणी करण्यात येईल व साखर वाटप प्रमाणाबाबत संचालक मंडळात चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.सूत्रसंचालन राजेंद्र शेटे यांनी केले. शैलेश सोनवणे यांनी आभार मानले.
'कात्रजचा खून झाला'... या फ्लेक्समुळे पुण्यात खळबळ
यावेळी कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री अनंतराव थोपटे, उपाध्यक्ष विकास कोंडे, कार्यकारी संचालक सुनील महिंद व संचालक पोपटराव सुके, कृष्णाजी शिनगारे, शोभा जाधव, सीमा सोनवणे, चंद्रकांत सागळे, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, उत्तम थोपटे, संदीप नगिणे सर्व संचालक मंडळ या वेळी उपस्थित होते. संचालक शैलेश सोनवणे यांनी आभार मानले. त्या वेळी कार्यकारी संचालक सुनील महिंद यांनी अहवाल वाचून कार्यक्रमपत्रिकेतील सर्व विषयांना सभासदांच्या संमतीने मंजुरी दिली.
“राजगड कारखान्यातील जुनी यंत्रसामुग्री बदलून पूर्णपणे सर्व नवीन यंत्रसामग्रीसह कारखान्याचे आधुनिकीकरण होत आहे. कारखान्याने मागील वर्षी सुरू केलेल्या इथेनॉल निर्मितीमध्ये आतापर्यंत २५ लाख ४९ हजार ८०५ लिटर इथेनॉलचे उत्पादन केले आहे. कारखान्याने १८ मेगावॅट को जनरेशन प्रकल्प सुरु करण्याचे ठरवले असून, त्याचा डीपीआर तयार केला आहे. तसेच, ४५ केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरी प्रकल्पासाठी कारखान्यास मंजुरी मिळाली असून, लवकरच या प्रकल्पाची उभारणी होत आहे. त्यामुळे ऊस उत्पादकास जास्त दर देता येईल."
- आमदार संग्राम थोपटे, अध्यक्ष, राजगड कारखाना