‘ससून’ च्या रक्तसंकलनात वाढ : ४७ हजारांहून अधिक रुग्णांना फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 10:30 PM2020-01-04T22:30:00+5:302020-01-04T22:30:01+5:30
२०१९ या वर्षात २१ हजारांहून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन
पुणे : अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या ससून रुग्णालयातील रक्तपेढीतील रक्तसंकलनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील दोन वर्षांमध्ये यामध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. २०१९ या वर्षात २१ हजारांहून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन झाले आहे. त्याचा फायदा ४७ हजारांहून अधिक रुग्णांना झाला आहे.
मागील काही वर्षांपासून ससून रुग्णालयाचा कायापालट होत आहे. हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि जुने शासकीय रुग्णालय आहे. सध्या विविध विभागांमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांचा ओढा मागील काही वर्षांपासून वाढला आहे. पुणे व परिसरासह राज्यभरातून विविध उपचारांसाठी रुग्ण ससूनमध्ये दाखल होत आहेत. यातील गरजु रुग्णांना ससूनच्या रक्तपेढीमधून मोफत रक्त दिले जाते. ही रक्तपेढीही आता आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करण्यात आली आहे. रक्तविघटन प्रक्रियेने रक्ताचे रक्तपेशी व प्लाझ्मा हे दोन मुख्य घटक काढले जातात. गरजेनुसार थॅलॅसेमिया, अॅनिमिया, अपघातग्रस्त रुग्णांना रक्ताची गरज भासते. मागील वर्षभरात ४७ हजार ३१८ रुग्णांना या रक्तपेढीतून रक्त पुरवठा करण्यात आला आहे.
रक्तपेढीमध्ये २०१३ यावर्षी एकुण ११ हजार २९६ रक्तपिशव्यांचे संकलन झाले होते. २०१७ पर्यंत यामध्ये फारशी वाढ झालेली दिसून येत नाही. हे संकलन केवळ ३ हजार पिशव्यांनी वाढले. २०१८ मध्ये मात्र हा आकडा १९ हजाराच्या पुढे गेला. तर मागील वर्षी २१ हजार पिशव्यांचा टप्पा पार केला आहे. यावर्षात संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (५,०५६), रॉबीन हुड आर्मी (११२६), सीओईपी (७०५), व्हीआयटी कॉलेज (५८३), बालाजी युनिव्हर्सिटी (४५७) व भारत फोर्ज (४०७) या संस्थांचे ससून रक्तपेढीसाठी रक्तदानाचे योगदान अधिक राहिले आहे. ससून रक्तपेढीच्या विभागप्रमुख डॉ. लिना नकाते, रक्तपेढी प्रमुख डॉ. नलिनी काडगी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाºयांकडून रक्तदानात वाढ होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
-----------
ससूनमधील बाह्यरुग्ण विभागात वर्षाला सुमारे ८ लाख तर आंतररुग्ण विभागात ८० हजार रुग्ण भरती होतात. तसेच वर्षाला सुमारे २० हजार लहान मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. रक्तपेढीमधूनही वर्षभरात ४७ हजारांहून अधिक रुग्णांना रक्तपुरवठा केला आहे. समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने सर्वांनी रक्तदान करायला हवे.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय
------------