सोयाबीन, मक्याच्या क्षेत्रात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:11 AM2021-05-26T04:11:41+5:302021-05-26T04:11:41+5:30
पुणे : जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने पूर्ण केली आहे. येत्या काही दिवसांत लागवडीला सुरुवात होणार आहे. त्या ...
पुणे : जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने पूर्ण केली आहे. येत्या काही दिवसांत लागवडीला सुरुवात होणार आहे. त्या दृष्टीने खतांची आणि बियाण्यांची पूर्तता करण्यात आली आहे. या वर्षी सोयाबीन आणि मक्याच्या क्षेत्रात वाढ झाली असल्याची माहिती कृषी सभापती बाबूराव वायकर यांनी दिली.
खरीप हंगामाच्या तयारीसंदर्भात नुकतीच आढावा बैठक पार पडली. याबाबत खरीप हंगामाच्या तयारीची माहिती वायकर यांनी मंगळवारी (दि. २५) पत्रकार परिषदेत दिली. वायकर म्हणाले की, यावर्षी २ लाख १९ हजार ५०० हेक्टरवर खरीप हंगामातील पिकांची लागवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने तयारी केली आहे. त्यांना खतांची आणि बियाण्यांची कमी जाणवणार नाही यासाठी तयारी करण्यात आली आहे. यंदा ६१ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाणार आहे. तर, ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरीची लागवड होणार आहे.
यंदा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत खरीप सोयाबीन क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षी २६ हजार ५०० हेक्टरवर साेयाबीनची पेरणी करण्यात आली होती. यावर्षी त्यात वाढ होऊन २८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर साेयाबीनची लागवड केली जाणार आहे. मक्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. २५ हजार हेक्टरवर त्याची लागवड केली जाणार आहे. भुईमूग १६ हजार हेक्टरवर लावला जाणार आहे. यंदाच्या हंगामासाठी २८हजार ८६ क्विंटल बियाणे लागणार आहे. यातील १६ हजार ७१ क्वीटंल बियाणे मिळाले आहे. शेतकऱ्यांना खतांची कुठलीही टंचाई भासणार नाही. तसेच सबसीडी जाहीर झाली असल्याने वाजवी दरात खते उपलब्ध होतील असे वायकर म्हणाले. गेल्या वर्षी १ लाख ९५ हजार ३४८ मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली होती. यावर्षी २ लाख ५४ हजार ८०० मेट्रिक टन खतांची मागणी केली आहे. प्रत्यक्षात सरकारने १ लाख ८४ हजार ४८०मेट्रिक टन मंजूर केले असून १ लाख २१ हजार ९६३ मेट्रिक टन खत जिल्ह्याला मिळाले आहे. ८९हजार७०० मेट्रिक टन खत मिळणे असून बाकी आहे.
चौकट
उसाच्या लागवड क्षेत्रात वाढ
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून उसाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी १ लाख ३० हजार ६३१ हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली होती. यात यावर्षी वाढ झाली असून १ लाख ३६ हजार हेक्टरवर लागवड होणार आहे.
चौकट
यंदा २ हजार ६३५ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट
खरीप हंगामासाठी गेल्या वर्षी १ हजार ६५३ कोटी ४३ लाख पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी १ हजार ६४७ कोटी ४३ लाखांच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आले होते. या वर्षी यात वाढ करण्यात आली आहे. २ हजार ६३५ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट यावर्षी ठेवण्यात आले आहे.