टँकरच्या फेऱ्यांमध्ये वाढ
By Admin | Published: November 14, 2015 03:11 AM2015-11-14T03:11:28+5:302015-11-14T03:11:28+5:30
शहरामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीकपात लागू केल्यानंतर टँकरच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे
पुणे : शहरामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीकपात लागू केल्यानंतर टँकरच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत टँकरच्या फेऱ्यांमध्ये ८ हजार १२६ फेऱ्यांनी वाढ झाली आहे. पाण्याचा कमी दाबाने अपुरा पुरवठा होत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यांमध्ये निम्माच पाणीसाठी असल्याने यंदा शहराच्या पाण्यात ३० टक्के कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. कमी दाबाने पाणी येत असल्याने शहराच्या अनेक भागांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. विशेष अनेक मजली सोसायट्यांना पाणी कमी पडत असल्याने दररोज पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहेत. यंदा सप्टेंबर महिन्यामध्ये १५ हजार ४५२ टँकरची मागणी नोंदविली गेली आहे, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये १२ हजार टँकरची आवश्यकता भासली होती. मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात ११ हजार ५५० टँकरने पाणीपुरवठा झाला होता. यंदा आॅक्टोबर महिन्यात टँकरच्या १६ हजार २३३ फेऱ्या कराव्या लागल्या आहेत. पाणीकपात लागू होण्यापूर्वी केवळ आॅगस्ट १४ हजार टँकरची मागणी नोंदविली गेली होती. मागील वर्षीची तुलनेत पाणी कपातीनंतर टँकरच्या फेऱ्यांमध्ये ८ हजारांनी वाढ झाली झाली आहे.
नागरिकांकडून टँकरची मागणी आल्यास महापालिकेकडून सवलतीच्या दरात टँकर पुरविले जातात. पाण्याचा अपुरा पुरवठा होणारा उपनगरांचा भाग, बाणेर, पाषाणमधील सोसायट्या यांच्याकडून टँकरची मागणी नोंदविली जात आहे. गैरवापर होऊ नये, म्हणून टँकरला जीपीएस बसविण्यात आली आहे. मात्र जीपीएस सिस्टिमचा वापर प्रभावीपणे सुरू नसल्याचे दिसून येते. त्यामुळे टँकरच्या पाण्याची काळ्या बाजारात विक्री करण्याचे प्रकार अद्याप सुरूच आहेत.