मुलांच्या ह्रदय व इतर शस्त्रक्रियांची संख्या वाढवा; जिल्हा शल्यचिकित्सकांचा 'आरबीएसके' च्या डाॅक्टरांना इशारा
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: March 1, 2024 03:40 PM2024-03-01T15:40:07+5:302024-03-01T15:41:42+5:30
जानेवारी २०२४ च्या अहवालावरुन असे निदर्शनास येते की, आरबीएसके पथकांचे हृदय व इतर शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रमाण कमी
पुणे : पुणे जिल्हयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) तपासणी पथकांमार्फत केल्या जाणाऱ्या हृदय व इतर शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी असून ते वाढवण्यात यावे याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. नागनाथ यमपल्ले यांनी ‘आरबीएसके’ डाॅक्टरांच्या संघटनेला लेखी पत्र पाठवून इशारा दिला आहे. प्रत्येक पथकाने दरमहा अंगणवाडीतील १० व शाळेतील १० अशा कमीत कमी २० इतर शस्त्रक्रिया तसेच प्रत्येक पथकाने वर्षअखेर पर्यंत अंगणवाडीतील ५ व शाळेतील ५ अशा एकूण १० हृदयशस्त्रक्रिया करणे अनिवार्य आहे, असे त्यामध्ये म्हटले आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आराेग्य अभियान अंतर्गत पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण मध्ये मिळून आरबीएसके चे एकुण ७२ पथके कार्यरत आहेत. एका पथकामध्ये एक महिला व एक पुरूष वैदयकीय अधिकारी, एक औषध निर्माण अधिकारी (फार्मासिस्ट) आणि एक नर्स असे पथकाचे स्वरूप असते. हे सर्व पथके जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अंतर्गत काम करत असतात. वर्षातुन एकदा शासकीय शाळांची तर वर्षातून दाेन वेळा अंगणवाडीतील बालकांची तपासणी करून त्यांना आराेग्यविषयक पाठपुरावा करणे हे या पथकांचे काम असते.
एकेकाळी पुणे जिल्हा ह्रदयशस्त्रक्रिया करण्याबाबत राज्यात आघाडीवर हाेता. परंतू, आता मात्र जिल्हयातील आरबीएसके पथकांना ह्रदय आणि इतर शस्त्रक्रिया वाढवण्याबाबत सांगावे लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असले तरी त्याला कारणेही तसेच आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांनी म्हटले आहे की, हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रियांबाबत वरिष्ठ स्तरावरुन वारंवार नाराजी व्यक्त केली जात आहे. या राज्यस्तरावरुन सामंजस्य करार झालेल्या मान्यताप्राप्त रुग्णालये, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा ज्योतीबा फुले योजनेअंतर्गत असलेले रुग्णालये तसेच शासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये यांच्यामार्फत शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढवावे अशा सूचना आपणास देण्यात आल्या होत्या. परंतु, जानेवारी २०२४ चा हृदय व इतर शस्त्रक्रिया पथकनिहाय अहवालावरुन असे निदर्शनास येते की, आरबीएसके पथकांचे हृदय व इतर शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रमाण कमी आहे, असे या पत्रात म्हटले आहे.