पर्यटन वाढवून नवा महाराष्ट्र घडवू - आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 05:21 AM2020-02-16T05:21:26+5:302020-02-16T05:21:47+5:30
आदित्य ठाकरे । सत्ताधारी विरोधी भेद करत नाही
पुणे : पर्यटन हा सुरूवातीपासूनच आवडीचा विषय होता. त्यामुळेच आता त्याच खात्याचा मंत्री म्हणून काम करताना सत्ताधारी विरोधी असा भेद कधीही करत नाही. सर्वांना बरोबर घेऊन एक नवा महाराष्ट्र घडवू, असा निर्धार राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाउंडेशन तसेच विविध योजनांच्या संकेतस्थळाचे उद््घाटन पुण्यात शनिवारी करण्यात आले. पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेता मिलिंद गुणाजी, निर्माती दीपशिखा, पर्यटन विभागाच्या सचिव वलसा नायर सिंग व्यासपीठावर उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, पर्यटनाचा विकास झाला तर रोजगार निर्माण होतील. महाविकास आघाडीत युवा आमदारांची संख्या जास्त आहे. आम्ही एकत्र असतो. प्रत्येकजण नवे काही केले तर ते दुसऱ्यापर्यंत पोहचवतो. यातूनच नव्या महाराष्ट्राची सुरूवात होणार आहे.
रोहित पवार म्हणाले, गावातून शहरात जाताना शेतात आलेले काही ना काहीतरी नेले जाते. त्याचप्रमाणे शहरातील लोकांनीही गावाकडे येताना गावाला काही द्यावे, ते मातीचे देणे समजावे अशा उद्देशाने फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे.
एकात्मिक विकास फाउंडेशनच्या बोधचिन्हाचे, गीताचे, मतदार संघातील पर्यटनस्थळांची माहिती असणाºया संकेतस्थळाचे, कर्जत जामखेड येथील पर्यटनाच्या माहिती देणाºया वेबसिरिजचे पाहुण्यांच्या हस्ते उद््घाटन, अनावरण करण्यात आले. आयआयटी पवई व टाटा इनस्टिट्यूट सोशल सायन्स या दोन संस्थाबरोबर कर्जत जामखेड मतदारसंघातील विकास कामांच्या संशोधन व विकास यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.