पुण्यात वाढतीये वाहतूकीचे नियम माेडणाऱ्यांची संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:48 PM2018-04-11T12:48:46+5:302018-04-11T12:48:46+5:30
पुण्यातील वाहनसंख्येबराेबरच नियम माेडणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत अाहे. पुण्यातील वानवडी, सांगवी, हिंजवडी या भागांमध्ये वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन जास्त प्रमाणात हाेत असल्याचे पाेलिसांनी दिलेल्या अाकडेवारीतून समाेर अाले अाहे.
पुणे : दिवसेंदिवस पुण्यातील वाहनांची संख्या वाढत असताना, अाता नियम माेडणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत अाहे. ई-चलन, सीसीटिव्ही, वाहतूक पाेलीस यांच्यामाध्यमातून वाहतूकीला शिस्त लावण्याचा वाहतूक शाखा प्रयत्न करत असली तरी काही बेजबाबदार वाहनचालकांवर त्याचा कुठलाही परिणाम हाेत नसल्याचे दिसून येत अाहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते मार्च 2018 या कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये वानवडी भागात सर्वाधिक वाहनचालकांनी नियमभंग केल्याचे समाेर अाले अाहे.
पुण्यातील वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस जटील हाेत चालली अाहे. वाहनसंख्या वाढल्यामुळे पार्किंगचाही माेठा प्रश्न निर्माण झाला अाहे. सकाळी व संध्याकाळी शहरातील वाहतूक काेंडीला पुणेकर कंटाळले असताना या नियम माेडणाऱ्यांकडून वाहतूक काेंडीत भर पडत अाहे. वाहतूक पाेलिसांनी दिलेल्या अाकडेवारीनुसार जानेवारी ते मार्च 2018 या कालावधीत वानवडी भागात नियम माेडणाऱ्या 15 हजार 64 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या खालाेखाल सांगवी येथे 14 हजार एकशे 72 तर हिंजवडी येथे 9 हजार सातशे 68 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली अाहे. विशेष म्हणजे ज्या भागात सर्वात जास्त वाहतूकीचे नियम माेडल्याची प्रकरणे समाेर अाली आहेत, ते भाग पुण्यातील सुशिक्षित नागरिकांचे भाग म्हणून अाेळखले जातात.
वाहतूकीचे नियम ताेडणाऱ्यांच्या वाढत्या संख्येबराेबरच बेशिस्त पार्किंगचा प्रश्नही पुणेकरांना सतावताेय. शहरातील बहुतांश रस्त्यांवर बेशिस्तपणे केलेली पार्किंग अाढळून येते. त्यामुळे वाहतूक काेंडीची समस्य उद्भवत असते. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी तसेच वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करु नये असे अावाहन पुण्याचे वाहतूक उपायुक्त अशाेक माेराळे यांनी केले अाहे.