अवजड वाहनांची भारवहन क्षमता वाढ
By admin | Published: January 31, 2016 04:30 AM2016-01-31T04:30:11+5:302016-01-31T04:30:11+5:30
देशभरातील मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना वहन क्षमतेपेक्षा ५ टक्के अधिक वजन वाहून नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत केंद्र शासनाने अधिसूचना काढली असून, त्या आधारे
पुणे : देशभरातील मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना वहन क्षमतेपेक्षा ५ टक्के अधिक वजन वाहून नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत केंद्र शासनाने अधिसूचना काढली असून, त्या आधारे राज्य शासनानेही या जादा वजन वाहण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाचा फायदा देशभरातील तब्बल ७ लाख मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना मिळणार आहे.
ही वजन वहन क्षमता वाढवून देण्याची मागणी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे सदस्य बाबा शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या नवीन आदेशाबाबतच्या सूचना राज्य शासनाने सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १३३ नुसार, माल वाहतूक करणारी वाहनांना त्यांना ठरवून देण्यात आलेल्या वजन क्षमतेपेक्षा जास्त वजन गाडीत भरल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर खटला दाखल करण्यात येत होता. तसेच दंडही आकारण्यात येत होता. त्यासाठी प्रतिटन २५०० रुपयांचा दंड आकारला जात होता. यात प्रामुख्याने ट्रक, ट्रॅक्टर, टेम्पो, टे्रलर या वाहनांचा समावेश होता. ही वजन क्षमता वाढविण्याची मागणी संघटनेने केली होती. नव्या आदेशानुसार या वहन क्षमतेपेक्षा ५ टक्के जादा वजन असल्यास कारवाई केली जाणार नाही. समजा एखाद्या गाडीची वहन क्षमता १६ टन असेल, तर त्याच्या ५ टक्के म्हणजेच ८०० किलो अतिरिक्त वजन घेऊन जाता येणार आहे.