महात्मा फुलेंविषयीच्या उर्दू साहित्यात वाढ
By Admin | Published: April 12, 2015 12:43 AM2015-04-12T00:43:59+5:302015-04-12T00:43:59+5:30
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य महाराष्ट्राबाहेर पोहोचले असले तरी आता त्याला खूप काळ लोटला आहे.
पुणे : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य महाराष्ट्राबाहेर पोहोचले असले तरी आता त्याला खूप काळ लोटला आहे. ‘पगडीवाले बाबा’ अशा आपुलकीच्या विशेषणाने महात्मा फुले यांना उत्तरेत ओळखले जाते, परंतु उत्तर हिंदुस्थानातील एक प्रमुख भाषा असलेल्या उर्दूमध्ये फुल्यांविषयी खूपच कमी साहित्य आढळते, ही त्रूटी आता दूर होत आहे.
महापालिकेच्या शाळेतील शिक्षिका डॉ. नसरीन सय्यद यांनी उर्दूमध्ये ‘महात्मा फुले नजरिया’ आणि ‘शायरा सावित्रीबाई’ ही पुस्तके लिहून नवा इतिहास रचला आहे. महात्मा फुले जयंतीदिनाचे औचित्य साधून त्याच्या पहिल्या प्रती त्यांनी शनिवारी म. ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठानला भेट दिल्या.
प्रतिष्ठानचे अधिकारी डॉ. बाबा आढाव यांनी त्याचा स्वीकार केला. फुले प्रतिष्ठान कार्यालयाच्या आवारातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला डॉ. नसरीन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या, की कष्टकरी, अल्पसंख्याक समाजाला ज्यांच्याविषयी आपुलकी वाटते, त्यामध्ये फुले दांपत्याचे स्थान अधिक जवळचे आहे. कवयित्री असलेल्या सावित्रीबार्इंच्या योगदानाविषयी ‘शायरा सावित्रीबाई’ या पुस्तकात मी लिहिले. शायरा सावित्रीबाई लिहिल्यानंतर महात्मा फुल्यांविषयी लिखाण केल्याशिवाय त्याला पूर्णत्व येणार नाही, हे लक्षात आले म्हणून ‘महात्मा फुले नजरिया’ या पुस्तकाची निर्मिती करून हे काम पूर्ण केले असल्याचे त्यांनी सांगितले.