इंदापूर तालुक्यात विषाणुजन्य आजारात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 06:24 AM2017-08-30T06:24:26+5:302017-08-30T06:24:40+5:30
अधूनमधून पडणारा पाऊस, ढगाळ हवामान व जागोजागी साठलेले पाणी यांमुळे लासुर्णे परिसरात विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
लासुर्णे : अधूनमधून पडणारा पाऊस, ढगाळ हवामान व जागोजागी साठलेले पाणी यांमुळे लासुर्णे परिसरात विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सर्दी, खोकला व ताप येणाºया रुग्णांची संख्या सरकारी व खासगी रुग्णालयात वाढत असल्याचे चित्र इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात पाहावयास मिळत आहे.
लासुर्णे व सणसर प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाºयांशी संपर्क साधला असता समजले, की सध्या विषाणुजन्य आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढले असून, त्यावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. सणसर प्राथमिक आरोग्य केंद्रात २५, तर लासुर्ण्यात २० रुग्ण सर्दी, खोकला व ताप यासारख्या आजारांचे आढळले.
संशयित स्वाइन फ्लूच्या
रुग्णाला घरी सोडले..
लासुर्ण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात एक संशयित स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला होता. त्यांच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने आज घरी सोडण्यात आले आहे. यावर आरोग्य सभापती प्रवीण माने यांच्याशी संपर्क साधला असता विषाणुजन्य आजारावर जिल्ह्यातील सर्व जिल्हा आरोग्य आधिकाºयांना यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र हे प्राथमिक उपचारांसाठी असतात. आजाराचे निवारण करून रुग्ण जास्त गंभीर असल्यास रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करावे लागते.
प्रतिबंधात्मक उपाय करण्याची मागणी
ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावामध्ये तातडीने धूरफवारणी करणे गरजेचे आहे. पावसामुळे गावात ठिकठिकाणी पाणी साठले आहे. त्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. परिणामी, रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे गावात व वाड्यावस्त्यांमध्ये तातडीने धूरफवारणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वाइन फ्लूची लस मिळावी
भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वाकसे यांनी सांगितले, की जिल्हा आरोग्य विभाग स्वाइन फ्लूविषयी उदासीन असून स्वाइन फ्लूच्या लशीबाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. लस प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यास परवानगी नसेल, तर जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून राज्य सरकारकडे मागणीबाबत त्वरित हालचाली कराव्यात. अन्यथा, जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या विरोधात पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करू.
निमसाखर परिसरात विषाणुजन्य आजारांचा धोका
निरवांगी : इंदापूर तालुक्यातील निमसाखर, निरवांगी, खोरोची, रासकरमळा, दगडवाडी व परिसरात पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली होती. पावासामुळे गवताचे प्रमाण वाढले. यामुळे परिसरात सौरटे व डासही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. डासांमुळे विषाणुजन्य आजारांचा धोका वाढला आहे.
निमसाखर, निरवांगी, रासकरमळा, खोरोची, बोराटवाडी या गावांच्या लगत शेती मोठ्या प्रमाणात आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला असल्याने शेतात पिकेही चांगली आहेत. सध्या तरी पावसाची रिमझिम चालू आहे.
यामुळे शेतात व गावालगत असलेल्या मोकळ्या जागेत गवताचे प्रमाणा चांगले झाले आहे. यामुळे डासही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. शेतातील सौरटांनी आता गावाकडे आपला मोर्चा वळवला आहे. यामुळे नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. निमसाखर ग्रामपंचायतीने निमसाखर गावात औषधफवारणी करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.