पाणीपट्टीत दरवर्षी ५ टक्केच वाढ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2016 01:11 AM2016-02-20T01:11:36+5:302016-02-20T01:11:36+5:30
महापालिकेने शहरामध्ये २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या नावाखाली शहराच्या पाणीपट्टीमध्ये सलग ५ वर्षे १५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असताना राज्य
पुणे : महापालिकेने शहरामध्ये २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या नावाखाली शहराच्या पाणीपट्टीमध्ये सलग ५ वर्षे १५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असताना राज्य शासनाने पाणी पुरवठा प्रकल्पांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेने दरवर्षी पाणीपट्टीमध्ये ५ टक्के वाढ करण्याच्या सूचना केल्या आहेत.
राज्याच्या नगरविकास विभागामार्फत पाणीपुरवठ्याचे विविध प्रकल्प राबविले जातात. नागरी संस्थांमार्फत या प्रकल्पांची कार्यवाही होत असताना त्यांची देखभाल व दुरुस्ती योग्य पद्धतीने होत नसल्याचे नगरविकास विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नगरविकास विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पाणी पुरवठा प्रकल्पांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दरवर्षी पाणीपट्टीमध्ये पाच टक्के वाढ करावी असे स्पष्ट केले आहे. योजनांचा प्राधान्यक्रम, भूसंपादन, स्वहिस्सा, अंमलबजावणीचा टप्पा, निविदा प्रक्रिया, स्रोतांचा विकास, जलशुद्धीकरण केंद्र, साठवण टाक्या आणि वितरण व्यवस्था, प्रकल्पांची देखभाल आणि दुरुस्ती याबाबतही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत.
पुणे महापालिकेने यापूर्वीच पाणीपट्टीत वाढ करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. शहराच्या पाणीपट्टीमध्ये पुढील वर्षासाठी १२ टक्के, तर त्यापुढील ४ वर्षे सलग १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासनाच्या सूचनेप्रमाणे आणखी वाढ करायची आवश्यकता आहे का, याची चाचपणी प्रशासनाकडून केली जाणार आहे.