खोडद रस्त्यावर बायपासवर गतिरोधकाची रुंदी वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:11 AM2021-09-13T04:11:16+5:302021-09-13T04:11:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खोडद : पुणे-नाशिक बायपासवर नारायणगाव-खोडद रस्ता चौकात असलेले गतिरोधक वाचविण्यासाठी चुकीच्या दिशेने वाहने घातली जात आहेत, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खोडद : पुणे-नाशिक बायपासवर नारायणगाव-खोडद रस्ता चौकात असलेले गतिरोधक वाचविण्यासाठी चुकीच्या दिशेने वाहने घातली जात आहेत, तसेच येथे तीन गतिरोधक पट्ट्या टाकण्यात आल्या आहेत. मात्र, काही चारचाकी वाहनचालक आहे त्याच वेगाने या गतिरोधकावरून वाहने घेऊन जात असल्याने येथील चौकात अपघाताचा धोका वाढला आहे. या चौकात आणखी गतिरोधक वाढविण्यात यावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
पुणे-नाशिक महामार्ग हा नारायणगाव खोडद रस्त्याला छेदून जात आहे. खोडद रस्त्यावर चौक करण्यात आला आहे. खोडदकडे व नारायणगावकडे जाताना-येताना अपघात होऊ नये म्हणून पुणे आणि नाशिकच्या दिशेने या महामार्गावर दोन्ही बाजूंनी तीन-तीन गतिरोधक पट्ट्या टाकण्यात आल्या आहेत. पुणे व नाशिककडून येणाऱ्या वाहनांचा वेग कमी व्हावा व नारायणगाव खोडद रस्ता ओलांडताना अपघात होऊ नये म्हणून हे गतिरोधक टाकण्यात आले आहेत. मात्र, नाशिक व पुण्याकडून येणारी काही चारचाकी वाहनचालक या गतिरोधकांवरून येताना आपल्या वाहनांचा वेग कमी न करता त्याच वेगात या गतिरोधकांवरून थेट निघून जात आहेत. यामुळे या ठिकाणी आता अपघाताचा धोका अधिकच निर्माण झाला आहे.
पुणे व नाशिक बाजूने आल्यानंतर नारायणगाव व खोडदकडे जाण्यासाठी वळण रस्ते काढण्यात आले आहेत. या वळण रस्त्यांवर प्रत्येकी केवळ एकच गतिरोधक पट्टी टाकण्यात आली आहे. मुख्य महामार्गावर असलेले ३ पट्टी गतिरोधक टाळण्यासाठी अनेक चारचाकी वाहने डावीकडे घेऊन या एक पट्टी गतिरोधक असलेल्या वळण रस्त्यांवरून पुढे खोडद व नारायणगावच्या रस्ता चौकातून त्याच वेगात पुढे नाशिक महामार्गावरून निघून जातात. यावेळी नारायणगाव-खोडद रस्ता ओलांडणारी वाहने व पुणे-नाशिक महामार्गावरून गतिरोधक वाचविण्याचा प्रयत्न करणारी वाहने ही समोरासमोर येतात व अपघाताच्या भीतीने काळजाचा ठोका चुकतो, तसेच मुख्य महामार्गावरील गतिरोधक वाचविण्यासाठी डाव्या वळण रस्त्यावर वाहने अचानक लेन बदलत असल्यानेही अपघात होण्याची शक्यता वाढत आहे.
चौकट
या ठिकाणी होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी वळण रस्त्यावरही ३ गतिरोधक पट्ट्या टाकणे गरजेचे आहे, तसेच या चौकात मंजूर झालेल्या भुयारी मार्गाचे काम कधी सुरू होणार याचीही प्रतीक्षा पूर्वेकडील गावांमधील ग्रामस्थांमध्ये आहे.
------------------------------‘नारायणगाव बाह्य वळण मार्ग सुरू झाल्यानंतर खोडद चौकातून महामार्गावरील वाहनांच्या वाहतुकीचा वेग पाहता तिथे असणाऱ्या गतिरोधकांची संख्या वाढविण्याची निश्चितच गरज आहे, तसेच राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी या चौकात मंजूर झालेल्या भुयारी मार्गाचे काम तातडीने सुरू करून पूर्वेकडील गावातील ग्रामस्थांना सुरक्षित प्रवासासाठी आश्वस्त करणे अत्यंत आवश्यक आहे.’
- गुंडीराज थोरात
अध्यक्ष, ग्रामविकास मंडळ, खोडद, ता. जुन्नर
----------------------------
120921\20210912_161119.jpg
कॅप्शन : पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव खोडद रस्त्यावर असलेल्या या चौकात गतिरोधक वाढविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.