तुळशीच्या रोपांना वाढली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:11 AM2021-05-07T04:11:38+5:302021-05-07T04:11:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुसंख्य व्यवसाय बंद असले तरी रोपवाटिकांना मात्र संजीवनी मिळाली आहे. ऑक्सिजन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुसंख्य व्यवसाय बंद असले तरी रोपवाटिकांना मात्र संजीवनी मिळाली आहे. ऑक्सिजन देणाऱ्या तुळशीच्या रोपांसह वेगवेगळ्या औषधी वनस्पतींच्या रोपांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे.
एरवी तुळशीची रोपे फक्त आषाढी कार्तिकीच्या वेळेस दिवाळीच्या तुलसी विवाहाच्या आधीच विकली जातात. आता मात्र तुळशीला मोठी मागणी असल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले.
तुळस ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू सोडण्यासाठी प्रसिद्ध आहे. अन्य वनस्पतींच्या तुलनेत तुळशीमध्ये हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच सध्या तुळशीची रोपे मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे. अनेकांकडून तर वाढलेल्या रोपासह कुंड्याच विकत घेतल्या जात आहेत. एकाच कुंडीत जास्त रोपे लावण्याचा, बंगल्यांच्या कडेने तुळशीची लागवड करण्याचे प्रकारही होत आहेत.
तुळशीबरोबरच आले, हळद, अश्वगंधा वगैरे औषधी वनस्पतींच्या रोपांचीही मागणी वाढली आहे. अनेक रोपवाटिकाचालकांचा असाच अनुभव आहे. विठ्ठलवाडीतील विठ्ठल नर्सरीचे संचालक साहेबराव म्हस्के यांनी सांगितले की, यापूर्वी हळदीच्या रोपांना कधीही मागणी नव्हती. आता मात्र आले, हळद याची विचारणा होते. कुंडीत येईल का, मोठी जागा लागते का असे प्रश्न ग्राहक विचारतात. कुंडीत येते असे सांगितले की हमखास रोपे घेऊन जातात. पावसाळ्यापूर्वी फुलझाडांना मागणी असायची. आता या औषधी वनस्पतीच्या रोपांनाही चांगली मागणी असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.
कोट
सर्वच झाडे ऑक्सिजन सोडत असतात, पण आपण घरात मोठी झाडे लावू शकत नाही. तुळशीला धार्मिक आधार आहेच, शिवाय घरात रोपे लावणे सहज शक्य आहे. तुळशी वृदावन उंचावर असते व पाणी घालताना बरोबर चेहरा तुळशीसमोर येतो. त्यामुळे कदाचित तुळशीची मागणी वाढली असावी आणि ते चांगलेही आहे.
- डॉ. हेमा साने, वनस्पतीतज्ज्ञ
--
बहुतांश मराठी घरांमध्ये तुळस असतेच. फ्लॅट संस्कृतीत ते थोडे मागे पडले होते. आमच्याकडे आषाढी वारीच्या काळात तुळशीच्या रोपांची मागणी असतेच. सध्या आम्ही कोणतीच रोपे देत नाहीत. पावसाळ्यापूर्वी आमची नर्सरी सुरू होईल. त्यावेळी तुळशीची रोपेही आणणार आहोत.
- अशोक घोरपडे, उद्यान अधीक्षक, महापालिका
---
हळदीची रोपे या सिझनमध्ये बरीच आणली होती. सगळी संपली. तुळशीला मागणी आहेच. प्रामुख्याने बंगल्यात राहणारे एकापेक्षा जास्त रोपे लागवडीसाठी नेत आहेत.
- साहेबराव म्हस्के, संचालक, विठ्ठल नर्सरी