सिंचनाच्या कामातून भूजलपातळीत वाढ

By admin | Published: April 12, 2017 04:01 AM2017-04-12T04:01:05+5:302017-04-12T04:01:05+5:30

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी या गावामध्ये शासकीय योजनांच्या माध्यमातून विकासाची गंगा अवतरली आहे. सिंचनाच्या कामातून

Increased ground water from irrigation works | सिंचनाच्या कामातून भूजलपातळीत वाढ

सिंचनाच्या कामातून भूजलपातळीत वाढ

Next

- सतिश सांगळे,  कळस

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी या गावामध्ये शासकीय योजनांच्या माध्यमातून विकासाची गंगा अवतरली आहे. सिंचनाच्या कामातून खालावलेली भूगर्भातील पाणीपातळी वाढीस लागली आहे. आज सिमेंट बांध, तलाव पाण्याने भरलेले आहेत.
विहिरी व हातपंप ऐन उन्हाळ्यात ओव्हरफ्लो झाले आहेत. आमदार आदर्श ग्राम योजनेतून होत असलेल्या कामांमुळे गावाचे चित्रच बदलत चालले आहे. शेळगावमधील वाड्यावस्त्या मिळून कडबनवाडी ग्रामपंचायत तयार करण्यात आली. या गावांची १५०० पर्यंत लोकसंख्या आहे. दहा वर्षांपूर्वीचा विचार केला तर हे गाव फारसे चर्चेत नव्हते. मात्र, तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आदर्श ग्रामयोजनेत निवड होताच कधीही गावाकडे न फिरकलेल्या यंत्रणांच्या गावशिवारात फेऱ्या वाढल्या. तहसीलदार, गटविकास अधिकारी असे सर्व जण गावात जाऊन भेटी घेऊ लागले. यामुळे ग्रामविकासाला चालना मिळाली. शेती हाच मुख्य व्यवसाय असलेल्या या भागातील विहिरींच्या पातळीत झपाट्याने घट झाली होती. गावाच्या एक हजार हेक्टरपैकी केवळ ४० टक्के शेतीच बागायती होती. राज्यात नव्याने आलेल्या शासनाने प्रत्येक आमदाराला आदर्श ग्राम बनविण्याचे उद्दिष्ट दिले. आमदार दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने या ग्रामपंचायतीची निवड केली. ग्राम दत्तक योजनेतील गावांना विशेष प्राधान्य देऊन विकास साधण्यासाठी आराखडा करून पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू झाले.

शेतीसाठी पाणी महत्त्वाचे आहे. आधी फारशा सुविधा नव्हत्या. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ धोरणाची अंमलबजावणी झाल्याने आता पातळीत कमालीची वाढ झाली. याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होत आहे. शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी गावात येऊन समस्या जाणून घेतात. त्यासाठी शासनाकडे उपाय सुचवीत आहोत. आमच्या गावाचे चित्र बदलले आहे, असे जलसंधारणाचे
प्रणेते भजनदास पवार यांनी सांगितले.

गाव ठरेल मॉडेल व्हिलेज
गावात याआधी अंगणवाडी होती. मात्र, अंगणवाडीला प्रशस्त जागा नसल्यामुळे बालकांच्या बसण्याची अव्यवस्था होती. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांच्या अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आले. गावातील बालकांना बसण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध झाली आहे. गावातील युवकांचे शरीरसौष्ठव व्हावे, लष्कर व पोलीस भरतीसाठी युवकांना सज्ज करण्यासाठी येथे व्यायामशाळेची उभारणी करण्यात आली. आतापर्यंत जवळपास चार कोटींपेक्षा अधिक निधीतून विविध विकासकामे करण्यात आली. तर दोन कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. लवकरच हे गाव एक मॉडेल व्हिलेज म्हणून समोर येणार आहे.

शिवाराचाही कायापालट...
या गावांची उपजीविका पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे. गावाचे रूपडे जसे बदलते आहे, तसाच बदल शेतीतही दिसू लागला. खालावलेल्या पातळीला जलसंधारणाच्या कामांनी आधार दिला.
नाला खोलीकरण-रुंदीकरण, बंधारे, तलावाचे पुनरुज्जीवन यामुळे पाणी साठवणक्षमता वाढली. परिणामी, पातळीत वाढ होऊन या कामांचे फलित दिसू लागले. गावाच्या तिन्ही दिशेला सिंचन तलाव आहे. हे तलाव तुडुंब भरल्याने विहिरींच्या पातळीत वाढ झाली.
२० फुटांच्या आत पातळी आली. याचा फायदा सिंचन वाढण्यासाठी होऊ लागला. गावाशेजारी वाहणाऱ्या नाल्यावरही सिमेंट बंधारा बांधल्याने त्यातही पाणी अडले. एक किलोमीटरपर्यंत त्यात पाणी आहे. कृषी विभागाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून या गावात शेकडो हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करण्यात आली.

Web Title: Increased ground water from irrigation works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.