‘टवाळखोर’ विद्यार्थ्यांची वाढली डोकेदुखी
By admin | Published: December 26, 2016 04:03 AM2016-12-26T04:03:56+5:302016-12-26T04:03:56+5:30
शहरातील नामांकित महाविद्यालयांसह उपनगर परिसरातील महाविद्यालयांमध्ये काही टवाळखोर घुसून गोंधळ घालत आहेत.
पुणे : शहरातील नामांकित महाविद्यालयांसह उपनगर परिसरातील महाविद्यालयांमध्ये काही टवाळखोर घुसून गोंधळ घालत आहेत. त्यामुळे महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण बिघडत चालले आहे. महाविद्यालयांसाठी हे टवाळखोर डोकेदुखी ठरत असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महाविद्यालयांच्या परिसरात पोलिसांनी गस्त घालण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी महाविद्यालयांनी केली आहे.
महापालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून नवीन विद्यापीठ कायदा मंजूर झाल्याने महाविद्यालयांत विद्यार्थी निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यातच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टवाळखोरांकडून मुलींची छेड काढली जाते. त्यामुळे महाविद्यालयीन वातावरण बिघडू नये, या उद्देशाने आवश्यक हालचाली होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. महाविद्यालयांचा परिसर मोठा असल्याने, तसेच आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवणे शक्य नसल्याने पोलिसांनी पेट्रोलिंग केले पाहिजे.
दोन दिवसांपूर्वी येरवडा परिसरातील गेनबा सोपानराव मोझे महाविद्यालयात काही टवाळखोरांनी बारावीच्या वर्गात घुसून एका विद्यार्थ्याला मारहाण केली. त्यात प्राचार्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. महाविद्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे प्राचार्यांनी पोलिसांना बोलावले. मात्र, पोलीस महाविद्यालयात पोहोचेपर्यंत टवाळखोर पसार झाले. गेल्या काही दिवसांपासून शाळा, महाविद्यालयातील मुला-मुलींना त्रास दिला जात असल्याने पोलिसांनीच अचानक महाविद्यालय परिसराला भेट देऊन टावळखोरांना ताब्यात घ्यायला हवे, अशी अपेक्षा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय सोमवंशी यांनी व्यक्त केली.
सोमवंशी म्हणाले, महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर तसेच महाविद्यालयाच्या आवारात विनाकारण काही टवाळखोर फिरताना दिसतात. (प्रतिनिधी)