हवेतील आर्द्रता अन् कमाल तापमानामुळे वाढला उकाडा; दोन-तीन दिवसांमध्ये पुण्यात पावसाची शक्यता
By श्रीकिशन काळे | Published: April 12, 2024 06:42 PM2024-04-12T18:42:06+5:302024-04-12T18:42:18+5:30
हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले तरी डिहायड्रेड होण्याची शक्यता अधिक असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी
पुणे : गेल्या १३ वर्षांमधील पुण्यातील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमान २८ एप्रिल २०१९ मध्ये नोंदवले गेले होते. तेव्हा ४३ अंशावर तापमानाचा पारा होता. यंदा एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा हा ३९ अंशावर आहे. यामध्ये थोडी-फार वाढ होण्याची शक्यता असून, मे अखेरपर्यंत कदाचित ४३ अंशापर्यंत कमाल तापमान जाऊ शकते, असा अंदाज ‘आयएमडी’चे माजी प्रमुख व ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला.
पुणे शहरातील किमान व कमाल तापमान वाढताना दिसून येत आहे. गेल्या २०१३ पासून पुण्यात एप्रिल महिन्यामध्ये सरासरी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. यंदा तरी अजून शिवाजीनगर येथील तापमान ४० अंशावर गेले नाही. परंतु, मे अखेरपर्यंत चाळशीपार जाऊ शकते, असा अंदाज आहे. यंदा पुण्यात दमट वातावरण अधिक असल्याचे अनुभवायला येत आहे. उकाडा अधिक जाणवत आहे. दुपारी उष्णता अधिक जाणवू शकते. कमाल तापमान ३९ अंशावर असले तरी नागरिकांना ते ४१ अंश सेल्सिअस असल्याचे वाटू शकते. कारण वातावरणात तेवढी उष्णता आहे.
शुक्रवारी (दि.१२) पुण्यात पावसाची शक्यता होती. कारण क्युम्युलोनिम्बस ढगांची काही प्रमाणात आकाशात निर्मिती झाली होती. पण ते ढगही नंतर नाहीसे झाले. त्यामुळे यापुढे आता दोन तीन दिवसांनी पुन्हा ढगांची निर्मिती होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रातून आर्द्रतायुक्त वारे गुजरातमार्गे महाराष्ट्र आणि पुण्याकडे वाहत आहेत, त्यामुळे शहराला सध्या दमट वातावरणाचा अनुभव येत आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले तरी डिहायड्रेड होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. काळजी न घेतल्यास हे वातावरण आरोग्यास घातक ठरू शकते. जेव्हा कमाल तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअस असते तेव्हा उष्णतेची लाट असल्याचे म्हटले जाते. पुण्यात सध्या तरी तशी लाट नाही. - डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ व माजी आयएमडी प्रमुख
एप्रिल महिन्यातील कमाल तापमान
२०१३ - ४१.३
२०१४ - ४०.७
२०१५ - ४०.०
२०१६ - ४०.९
२०१७ - ४०.८
२०१८ - ४०.४
२०१९ - ४३.०
२०२० - ४०.१
२०२१ - ३९.६
२०२२ -४१.८
२०२३ - ४०.०
२०२४- ३९.८