इंदापूर तालुक्यात दुष्काळाच्या दाहकतेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 01:08 AM2018-12-18T01:08:09+5:302018-12-18T01:09:03+5:30
पिके संकटात : तलाव कोरडे पडल्याने भावी काळात जलटंचाईचे संकट
पळसदेव : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. तलाव कोरडेठाक पडले आहेत. पिके जळाली आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. कधी नव्हे एवढी दुष्काळाची दाहकता पाहायला मिळते.
शेतातील उभी पिके जळू लागली आहेत. ऊसपिकाचे तर अधिक नुकसान झाले आहे. आताच ही परिस्थिती निर्माण झाली आहे, तर उन्हाळ्यात काय होणार? याचा प्रत्यय आत्ताच येऊ लागला आहे. विहिरीतील पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. विंधनविहिरींमधील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शेतातील पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. काही ठिकाणी विहिरीतील विद्युतपंप फक्त दोन तास चालतात. त्यामुळे शेतातील उभी पिके जगवायची कशी? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे पक्षीमित्र, पर्यटक, अभ्यासक, या ठिकाणी येतात. मात्र या वर्षी तलावात पाणी नसल्याने एकही पक्षी आलेला नाही. एरवी पक्ष्यांचा आवाज येणाºया या ठिकाणी शुकशुकाट दिसत आहे.
पाणी नसल्याने शेतकरी काहीच करू शकत नाही. त्यामुळे शेतातील पिके खाक झाली आहेत. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात पळसदेव, डाळज, भिगवण, भादलवाडी, कुंभारगाव, पिलेवाडी, अकोले या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती अधिक प्रमाणात आहे. दरवर्षी भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावावर चित्रबलाक पक्ष्यांची वसाहत गजबजलेली असते.