घरबसल्या आरोग्य तपासणी करणाऱ्यांची वाढली संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:11 AM2021-05-25T04:11:17+5:302021-05-25T04:11:17+5:30
प्रयोगशाळांचे निरीक्षण : लॉकडाऊनमुळे सुरक्षिततेला प्राधान्य पुणे : मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना नियमितपणे काही आरोग्य तपासण्या करणे ...
प्रयोगशाळांचे निरीक्षण : लॉकडाऊनमुळे सुरक्षिततेला प्राधान्य
पुणे : मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना नियमितपणे काही आरोग्य तपासण्या करणे गरजेचे असते. याशिवाय, थायरॉईड, व्हिटॅमिन कमतरता, कोलेस्टेरॉल, लिपिड प्रोफाइल अशा चाचण्या करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. दुसऱ्या लाटेचा उद्रेक आणि लॉकडाऊन यामुळे यंदा घरबसल्या आरोग्य तपासणी करून घेणाऱ्यांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ व्यक्तींचा समावेश आहे.
पूर्वीपासूनचे आजार किंवा नव्याने आजाराचे निदान झालेल्या रुग्णांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका अधिक असतो. अशा रुग्णांची आरोग्याची स्थिती तपासण्यासाठी दर ३ महिन्यांनी नियमित चाचणी करून घेणे आवश्यक असते. रक्तातील साखरेची तपासणी, युरिक ॲसिडची पातळी, हिमोग्राम, मूत्रपिंड, यकृत फंक्शन टेस्ट, लिपिड प्रोफाइल, रुटीन युरिन, फॅटी लिव्हर, सोनोग्राफी, लठ्ठपणा यांसारख्या विविध चाचण्या करण्यासाठी जवळपास ५० टक्के लोक घरच्या घरीच चाचणी करण्याला पसंती देत आहेत. यामध्ये लिपिड प्रोफाइल, एलएफटी, केएफटी, जीवनसत्त्वे आदींचा समावेश आहे.
मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, स्नायुंमधील वेदना, पोट विकार आणि हृदयासंबंधी समस्या, श्वसन विकार तसेच मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्ग (यूटीआय) सारख्या अनेक गंभीर समस्या उद्भवल्यास घरच्या घरीच चाचणी करणे नागरिकांना सुरक्षित वाटत आहे.
दिवसेंदिवस वाढत्या कोरोना संक्रमणामुळे नागरिकांना घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सहव्याधी असलेल्या वयस्कर व्यक्तींना अधिक धोका असल्याने त्यांच्या चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळांकडे ‘होम व्हिजिट’ची विचारणा वाढली असल्याचे प्रयोगशाळा चालकांनी सांगितले.
चौकट
“लॉकडाऊन दरम्यान मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदय आणि फुफ्फुसांच्या समस्या, युटीआय संसर्ग, सांधेदुखी, लठ्ठपणा आणि मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. सहव्याधी असलेल्या व्यक्ती (कोमॉर्बिड) तसेच नव्याने आजार निदान झालेल्या रुग्णांनी वेळोवेळी तपासणी करावी. विविध चाचण्यांसाठी घरगुती संकलनाची संख्या वाढली आहे. प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. केवळ डॉक्टरांनी दिलेली औषधे घ्या. प्रकृती खालावल्यास त्वरित उपचार घेण्यास विलंब करू नका.”
- डॉ. संजय इंगळे, पॅथॉलॉजिस्ट
चौकट
“कोरोनाची लक्षणे दिसत असल्यास अनेक जण चाचणीसाठी ‘होम व्हिजिट’ला पसंती देत आहेत. याशिवाय, रक्त तपासण्या, रुटीन युरिन टेस्ट यासाठीही होम कलेक्शनच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या काळात काही प्रयोगशाळा निम्म्या किमतीत तपासण्या करून देण्याची जाहिरात करत आहेत. नागरिकांनी अशा जाहिरातींना न भुलता दर्जा, सुरक्षितता, विश्वासार्हता याबाबीही तपासून पाहाव्यात.”
- डॉ. अनिकेत दिवेकर, पॅथॉलॉजिस्ट