कांद्याचा भाव वधारल्याने आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 02:32 AM2019-03-15T02:32:51+5:302019-03-15T02:33:07+5:30
कांदा उत्पादकांना अच्छे दिन; दोन महिने उकिरड्यावर फेकल्यावर कांदा पुन्हा बाजारात
मंचर : कांद्याच्या भावात काहीशी वाढ झाल्यानंतर मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याची विक्रमी आवक झाली आहे. तब्बल ५५ हजार पिशवी कांदा विक्रीसाठी आल्याने बाजार समिती आवारात माल ठेवण्यास जागा राहिली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा माल वाहनातच राहून वाहतूक कोंडी झाली होती. सकाळी सुरू झालेला लिलाव सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होता.
कांद्याचे ढासळलेले बाजारभाव सुधारत आहे. २ महिने कांद्याला बाजारभाव नव्हता परिणामी शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. काही शेतकऱ्यांनी कांदा शेतातच सोडून दिला. तर उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ शेतकºयांवर आली होती. १५ दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात काहीशी वाढ झाली. मंगळवारी झालेल्या लिलावात कांदा १० किलोस ९० रुपये या भावाने विकला गेला. बाजारभाव वाढू लागल्याने शेतकºयांनी तत्परतेने कांदा शेतातून काढून तसेच साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढला. त्यामुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झाली. तब्बल ५५ हजार पिशवी कांदा विक्रीसाठी आला. हा आतापर्यंतचा उच्चांक असल्याची माहिती विक्रेते बाळासाहेब बाणखेले यांनी दिली. मागील लिलावाला २२ हजार पिशवी आवक होवून ९० रुपये भाव मिळाला होता. बाजार समितीचा आवार, तरकारी मार्केट, कांदा पिशव्यांनी भरुन गेला होता.शेडमध्ये जागा कमी पडल्याने अगदी रस्त्यावर कांदा ठेवण्यात आला होता. जागा मिळेल तेथे शेतकरी त्यांचा कांदा ठेवत होते. आंबेगाव तालुक्याबरोबरच शिरुर, खेड या तालुक्यातील आवक झाली होती. दुपारी जागा उपलब्ध नसल्याने कांदा ट्रॅक्टर, पिकअप, टेम्पो या वाहनातच ठेवण्याची वेळ आली. परिणामी बाजार समितीत वाहतुक कोंडी झाली होती. ती सुरळीत करताना सुरक्षा रक्षकांची दमछाक होत होती.
दहा किलोलो ८५ रुपये
बाजार समितीत ३० आडते असून १५ खरेदीदार आहेत.सकाळी ११.३० वा.लिलावाला सुरुवात झाली. आवक भरपूर असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत लिलाव सुरु होते. चांगला कांदा ८५ रुपये १० किलो या भावाने विकला गेला. बदला १० ते २० रुपये,गोळी कांदा २० ते ४० रुपये या भावाने विकला गेला. येथील कांदा निर्यात केला जातो तसेच दिल्ली व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हा कांदा प्रामुख्याने पाठविला जातो. कांद्याचे बाजारभाव वाढल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. शेतकरी कांद्याचे भाव अजुन वाढण्याच्या प्रतिक्षेत आहे.