मावळात नवमतदार नोंदणीत युवक-युवतींचा वाढला टक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 12:19 AM2019-04-05T00:19:34+5:302019-04-05T00:19:58+5:30
निवडणूक विभाग : ६४ हजार नवमतदारांची नोंदणी, एकूण २२ लाख २७ हजार मतदार
पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदारसंघासाठी निवडणुकीची अधिसूचना जारी केल्यानंतर निवडणूक विभागाने अंतिम मतदार यादीही प्रसिद्ध केली. ३१ मार्च अखेर नवमतदारांची नोंदणी पूर्ण झाली असून, त्यामध्ये ३३,१६० युवतींची नोंदणी झाली आहे. तर, ३१,२५१ पुरुष व युवक नवमतदारांनी नोंदणी झाली. त्यानुसार पुरवणी मतदार यादीतून एकूण ६४,४११ नवमतदारांची नोंदणी झाल्याने मावळ मतदार संघातील एकूण मतदारांची संख्या २२ लाख २७ हजार ६३३ मतदारसंख्या झाली आहे.
पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यात विभागलेल्या मावळ मतदारसंघाचे क्षेत्रफळ अतिशय विस्तीर्ण आहे. या मतदारासंघात विधानसभेच्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यात पनवेल विधानसभा मतदारसंघ मोठा असून, येथे ५ लाख १४ हजार ९०२ मतदार आहेत. तर कर्जत विधानसभा मतदारसंघात सर्वांत कमी मतदार आहेत. २ लाख ७५ हजार ४८० इतकी कर्जतची मतदारसंख्या आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील चिंचवड, पिंपरी, मावळ विधानसभा मतदारसंघ तर घाटाखालील पनवेल, कर्जत व उरण या सहा विधासभा मतदारसंघाचा समावेश आहे. या निवडणुकीत घाटाखालील मतदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे उमेदवारांना घाटाखालील भागातही मोठ्या प्रमाणात प्रचार करावा लागणार आहे. या मतदारसंघात पनवेलच्या खालोखाल चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो. चिंचवडमध्ये ४ लाख ७६ हजार ७८० मतदार आहेत.
चिंचवडला सर्वाधिक २७ तृतीयपंथी मतदार
मावळ लोकसभा मतदारसंघात ३२ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यात सर्वाधिक चिंचवडमध्ये तृतीयपंथी मतदार आहेत. २७ तृतीयपंथी मतदारांची चिंचवडला नोंद करण्यात आली आहे. त्या खालोखाल पिंपरीत ४ आणि उरणला केवळ एक तृतीयपंथी मतदाराची नोंद झाली. पनवेल, कर्जत आणि मावळ या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये तृतीयपंथी एकही मतदार नाही.
मतदारसंख्येत २ लाख ७३ हजारांनी वाढ
मावळ लोकसभेमध्ये २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत १९ लाख ५३ हजार ७३१ मतदार होते. त्यापैकी ११ लाख ७३ हजार ९४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. २०१४ मध्ये मावळात ६० टक्के मतदान झाले होते. २०१९ मध्ये २०१४ च्या तुलनेत २ लाख ७३ हजार ९०२ मतदार वाढले आहेत. यात महिलांची संख्या अधिक असून १ लाख ४३ हजार ५५९ महिला मतदार वाढल्या आहेत. तर, १ लाख ३० हजार ३११ पुरुष मतदार वाढले आहे. या वेळी ११ लाख ६६ हजार २७२ पुरुष, तर १० लाख ६१ हजार ३२९ महिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारसंख्या
पनवेल : ५,१४,९०२
कर्जत : २,७५,४८०
उरण : २,८६,६५८
मावळ : ३,३२,११२
चिंचवड : ४,७६,७८०
पिंपरी : ३,४१,७०१
एकूण : २२,२७,६३३