कीटकनाशकांचा मारा वाढल्याने मधमाश्यांचा शहराकडे ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:10 AM2021-05-20T04:10:03+5:302021-05-20T04:10:03+5:30

- उसाच्या शेतीचे प्रमाण अधिक; जीवनशैली बदलत असल्याचे चित्र जागतिक मधमाशी दिन पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये शेतात कीटकनाशके, ...

Increased pesticide infestation draws bees to the city | कीटकनाशकांचा मारा वाढल्याने मधमाश्यांचा शहराकडे ओढा

कीटकनाशकांचा मारा वाढल्याने मधमाश्यांचा शहराकडे ओढा

Next

- उसाच्या शेतीचे प्रमाण अधिक; जीवनशैली बदलत असल्याचे चित्र

जागतिक मधमाशी दिन

पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये शेतात कीटकनाशके, रासायनिक खतांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे मधमाश्यांची संख्या वेगाने कमी होत आहे. तसेच, ग्रामीण भागात आता मधमाश्यांचे पोळेही खूप कमी दिसत आहे. परंतु, या मधमाश्यांनी आता आपला मोर्चा शहराकडे वळविला आहे. कारण, शहरात कीटकनाशके किंवा रासायनिक खतांचा वापर होत नाही आणि इथे झाडंही मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे शहरात पोळं दिसत आहेत. मधमाश्यांनी आपली जीवनशैली बदलल्याचेच हे चित्र आहे.

सर्वाधिक परागीभवन करण्यात मधमाश्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मधमाश्यांचे अस्तित्व अतिशय महत्त्वाचे आहे. या मधमाश्यांवर अभ्यास करणारे डॉ. महेश गायकवाड म्हणाले, ‘‘गावात मधमाश्या कमी होत आहेत. कारण, औषधांची फवारणी करणे हा प्रकार वाढला आहे. उत्पादन अधिक व्हावे या आशेने शेतकरी औषधे वापरत आहेत. पण, त्याचा परिणाम मधमाश्यांवर होत आहे. मधमाश्यांना वाचविणे गरजे आहे. कारण, त्यांच्यामुळे खूप परागीभवन होते. त्यांचे संवर्धन करण्यासाठी शहरातील नागरिकांनी त्यांना कसलाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. कुठेही पोळे दिसले तर धूर करून त्यांना उठवू नये.’’

‘‘ग्रामीण भागात पूर्वी विविध पिकांचे उत्पादन होत असे. आता पुणे जिल्ह्यात पाहिले तर सर्वाधिक उत्पादन उसाचे आहे. त्यामुळे मधमाश्यांना त्यांचे खाद्य मिळत नाही. मधमाश्यांसाठी काटेरी झाडे, बोर, बाभूळ, जांभूळ अशी झाडं लावावीत, तरच त्यांना खाद्य मिळेल,’’असे गायकवाड म्हणाले.

————————————————

ही झाडं, वेली लावा

मधमाश्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी शेवगा, कडूनिंब, मोहरी अशी झाडं लावावीत. ज्या फुलांमध्ये मकरंद असतो, ती रोपं आवश्य लावावीत. काकडीचा वेल, भोपळा, कारले, जाई-जुई, गुळवेल लावणे गरजेचे आहे. शहरात इमारतीच्या बाजूला, गार्डनमध्ये किंवा बाल्कनीत कुंडीत हे लावू शकतो.

——————————————-

शहरात इमारतीच्या अनेक भागात पोळं दिसले, तर नागरिकांनी ते नष्ट करू नये. कारण, मधमाश्या तीन महिन्यांनंतर तिथून आपली वसाहत हलवतात. कोणी पोळं उठवलं तर आपण शांतपणे उभे राहिले, तर त्या माशा आपल्याला चावत नाहीत. पण, त्यांना जर काही धोका वाटला तर त्या चावतात. जर मधमाशी चावली, तर त्या चावा घेतलेल्या ठिकाणी माती लावावी किंवा हिरवा पाला चोळावा, त्याचा त्रास होणार नाही.

- डॉ. महेश गायकवाड, मधमाश्या संशोधक

———————————-

Web Title: Increased pesticide infestation draws bees to the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.