आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
By admin | Published: May 25, 2017 02:46 AM2017-05-25T02:46:29+5:302017-05-25T02:46:29+5:30
परिसरातील एक एकर जमीन नावावर करण्यासाठी जमीन खरेदी-विक्रीदारांचे अपहरण करत त्यांना डांबून ठेवून जबर मारहाण केल्याप्रकरणातील पाच
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुठा (ता. मुळशी) परिसरातील एक एकर जमीन नावावर करण्यासाठी जमीन खरेदी-विक्रीदारांचे अपहरण करत त्यांना डांबून ठेवून जबर मारहाण केल्याप्रकरणातील पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
श्रीनाथ सुनील विटेकर (२९, रा. केळेवाडी, पौड रोड), प्रसाद विठ्ठल ढेणे (वय २९, रा. कर्वेनगर), अनंत रामचंद्र घरत (वय ३०), राजेश संजय शेलार (वय २२), विजय गणपतराव ज्वारी (वय २१, तिघेही रा. आंबिल ओढा) अशी कोठडीत वाढ करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १५ ते १९ मे दरम्यान घडली.
अपहृत व्यक्तीने काही दिवसांपूर्वीच मुठा भागात एक एकर ३ गुंठे जमीन खरेदी केली होती. त्याने दोन महिन्यांपूर्वी विटेकर व ढेणे यांच्याकडून ६० हजार रुपये उसने घेतले होते. ते त्यांना परतही केले. दरम्यानच्या काळात विटेकर व ढेणे यांना अपहृत दोघांकडे मुठा भागात एक एकर जमीन असल्याचे समजले. दोघांना धमकावून तसेच मारहाण करुन जबरदस्तीने जमीन घेता येईल, असे त्यांना वाटले. त्यानुसार त्यांनी दोघांचे अपहरण करण्याचा कट रचला. १५ मे रोजी शनिवार पेठेतून दोघांना दुचाकीवरून पळवून नेत अपहरण केले. त्यानंतर या दोघांना दांडेकल पूल भागातील एका इमारतीमध्ये डांबून ठेवत चार दिवस त्यांना जबर मारहाण केली होती.
याप्रकरणी त्यांना अटक करत त्यांच्याकडे गुन्ह्याचा तपास करण्यात आला. या वेळी त्यांनी फिर्यादीचे मोबाईल व गाडी जबरदस्तीने काढून घेत त्यांना शिवीगाळ केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत आल्याने
त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यासाठी तसेच तपास करायचा असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली.