जिल्ह्यात वाढली टंचाईची दाहकता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 02:42 AM2018-12-11T02:42:54+5:302018-12-11T02:43:11+5:30
एकूण ३८ टँकरनी पाणीपुरवठा : बारामतीत १५, तर शिरूरमध्ये ११ टँकर, पुणे विभागातील १०० गावांत १०० टँकर
पुणे : दुष्काळाची दाहकता वाढू लागली असून, पुणे विभागातील १०० दुष्काळी गावांमध्ये १०० टँकरनी पाणीपुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात सर्वाधिक ३१, तर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात १५ आणि शिरूरमध्ये ११ टँकर सुरू आहेत. विभागातील १ लाख ८२ हजार २६० नागरिक दुष्काळाने बाधित असून, बाधित जनावरांची संख्या १९ हजार ९०१ आहे. पुणे जिल्ह्यातील टँकरची संख्या ३० वरून ३८ झाली आहे.
पुणे विभागातील सातारा, सांगली, पुणे व सोलापूर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत चालली आहे. विभागात ६ डिसेंबर रोजी ९१ टँकर सुरू होते, तर १० डिसेंबर रोजी टँकरची संख्या १०० वर गेली. सध्या १०० गावे आणि ६७६ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. साताऱ्यात ३९, पुण्यात ३८, सांगलीत १८ आणि सोलापूर जिल्ह्यात ५ टँकर सुरू आहेत.
पुणे विभागातील सातारा जिल्ह्यात माणमध्ये ३१, खटावमध्ये ५ तर कोरेगावमध्ये १ आणि फलटण येथे २ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अनेक गावांत तसेच वाड्यावस्त्यांत पाण्याची कायमस्वरूपी सोय नसल्याने टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात जवळपास सहा तालुक्यांतील २५ गावे आणि २७१ वाड्यावस्त्यांमधील ७२ हजार ९५९ गावांना ३८ टँकरनी पाणीपुरवठा केला जात आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची दाहकता वाढली आहे.
भविष्यात या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जवळपास १२ गावे तसेच १३१ वाड्यावस्त्यांवर १५ टँकरनी पाणीपुरवठा सध्याच्या स्थितीत सुरू आहे. बारामातीपाठोपाठ शिरूरमध्ये सर्वाधिक ११ टँकर सुरू आहेत. शिरूर तालुक्यातील ५ गावे आणि ४६ वाड्यावस्त्यांना टँकरने पाणी पुरवले जात आहे.
दौंड तालुक्यातील ७ गावे आणि ६३ वाड्यावस्त्यांसाठी ७ टँकर सुरू करण्यात आले आहेत. तसेच, पुरंदर व जुन्नरमध्ये प्रत्येकी २ आणि आंबेगावमध्ये १ असे एकूण ३८ टँकर सुरू आहेत. सांगलीत खानापूर येथे ३, आटपाडीत ८, जतमध्ये ४, कवठे महांकाळ येथे २ आणि तासगाव येथे १ टँकर सुरू आहे. तसेच, सोलापूर जिल्ह्यात माढा येथे ३ आणि करमाळा तालुक्यात २ टँकर सुरू आहेत.
जिल्ह्यात धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणे जवळपास भरली. मात्र, शेतीसाठी आवश्यक असा पाऊस न झाल्याने आजही अनेक तालुक्यांतील नद्या तसेच तलाव कोरडे पडले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुष्काळाची दाहकता वाढली आहे. राज्यभरात प्रशासनाने दुष्काळी स्थिती जाहीर केली आहे. सुरुवातीला ९ टँकरद्वारे जिल्ह्यात पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, यात वाढ झाली असून ही संख्या ३८वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात ७२ हजार ९५९ नागरिकांची तहान टँकरवर
पुणे जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. जवळपास ६ तालुक्यांतील २५ गावे आणि २७१ वाड्यावस्त्यांवरील ७२ हजार ९५९ नागरिकांची तहान ही टँकरच्या पाण्याने भागवली जात आहे. डिसेंबर महिन्यातच ही स्थिती असल्याने भविष्यात टँकरच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे.