शहरामध्ये वाढले ध्वनिप्रदूषण
By admin | Published: November 8, 2016 01:31 AM2016-11-08T01:31:29+5:302016-11-08T01:31:29+5:30
यंदाच्या दिवाळीत फटाक्यांचा आवाज वाढल्याचा निष्कर्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढला असून, गतवर्षीच्या तुलनेत पिंपरीत तीन डेसिबल आणि चिंचवडला
पिंपरी : यंदाच्या दिवाळीत फटाक्यांचा आवाज वाढल्याचा निष्कर्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढला असून, गतवर्षीच्या तुलनेत पिंपरीत तीन डेसिबल आणि चिंचवडला चार डेसिबलने वाढ झाली आहे. दिवसाबरोबर रात्रीचेही ध्वनिप्रदूषण वाढले आहे.
उद्योगनगरीत दिवाळीत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणवादी संस्थांच्या वतीने फटाकेविरहीत दिवाळी साजरी करावी, असे आवाहन केले जाते. मात्र, दिवाळीतील फटाक्यांचा आवाज कमी झाला नसल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केलेल्या तपासणीतून दिसून आले आहे.
महापालिकेचा पर्यावरण विभागाच्या मदतीने पिंपरीतील डिलक्स चौक, चिंचवड येथील चापेकर चौकात ध्वनी प्रदूषण तपासण्यासाठी यंत्रणा लावण्यात आली होती. ३० आॅक्टोबर लक्ष्मीपूजन, ३१ आॅक्टोबर दिवाळी पाडवा, एक नोव्हेंबर भाऊबीज अशी तीन दिवस तपासणी करण्यात आली. त्यात लक्ष्मीपूजनास फटाक्याचा आवाज अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यापाठोपाठ पाडवा आणि भाऊबीजेला फटाके वाजविले आहेत.
ध्वनिमर्यादेचे उल्लंघन
प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनीची मर्यादा निश्चित केली आहे. दिवसासाठी ५५ डेसिबल, रात्री निवासी क्षेत्रासाठी ५५डेसिबल, सायलेंट झोनसाठी दिवसा ५० डेसिबल, रात्री ४० डेसिबलची मर्यादा घालून दिली आहे. मात्र, शहरात या मर्यादेचे उल्लंघन झाले आहे, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात म्हटले आहे. निवासी क्षेत्र व बाजारपेठा या क्षेत्रात या वर्षी पाहणी करण्यात आली. त्यात मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. केवळ तपासणीचा सोपस्कार करण्यापलीकडे मंडळ कोणतेही काम करीत नाही, अशी टीका पर्यावरण संवर्धन करणाऱ्या संस्थांकडून होत आहे. (प्रतिनिधी)
प्रशासनाला निविदांत रस
महापालिकेचा पर्यावरण विभाग केवळ नवीन प्रकल्पांच्या निविदा काढण्यात मश्गूल असतो. त्यातच अधिकाऱ्यांना रस आहे. पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल तयार करण्यापलीकडे पर्यावरण विभाग कोणतेही काम करीत नसल्याची पर्यावरणाचे संवर्धन करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.
माहितीस टाळाटाळ
दिवाळीच्या फटाका प्रदूषणाबाबत पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांना माहिती विचारली असता, त्यांनी ती देण्याचे टाळले. ध्वनिप्रदूषण तपासणे हे काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केले जाते. ही माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही, असे सांगितले. त्यानंतर मंडळाकडून याबाबतची माहिती मिळाली. या वर्षी शहरातील केवळ तीनच परिसरांची तपासणी केली. विविध भागात तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
प्रदूषणात वाढ
गेल्या दोन वर्षांपूर्वी दिवाळीत पिंपरी डीलक्स चौकात प्रदूषण अधिक होते. त्यात घट झाली असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रदूषण वाढतच आहे. चिंचवड आणि चापेकर चौकात दोन वर्षांपूर्वी लक्ष्मीपूजनात प्रदूषण अधिक होते ते गेल्या वर्षी कमी झाले. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रदूषण या वर्षी वाढले आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीचे प्रदूषण वाढले आहे. पाडवा आणि भाऊबीज या दिवशी प्रदूषण कमी झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.