साखर उतारा वाढला; उत्पादन ७७.६ लाख टन, मार्चअखेर चालेल हंगाम

By नितीन चौधरी | Published: February 14, 2024 04:18 PM2024-02-14T16:18:23+5:302024-02-14T16:19:17+5:30

राज्यात आतापर्यंत ७९० लाख टन ऊस गाळपापासून ७७.६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे

increased sugar intake Production 77.6 lakh tonnes season to end March | साखर उतारा वाढला; उत्पादन ७७.६ लाख टन, मार्चअखेर चालेल हंगाम

साखर उतारा वाढला; उत्पादन ७७.६ लाख टन, मार्चअखेर चालेल हंगाम

पुणे : गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच यंदाच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्यामुळे ऊस उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. परिणामी गाळप हंगामाच्या सुरुवातीला साखर उताऱ्यात मोठी घट दिसून आली. मात्र फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत साखर उतारा गेल्या वर्षी इतकाच अर्थात ९.८३ टक्के मिळाला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ७९० लाख टन ऊस गाळपापासून ७७.६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उताऱ्यात वाढ होत असल्याने कारखानदारांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदाचा गाळपहंगाम मार्चअखेरपर्यंत चालेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी राज्यात पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने साखर उत्पादक जिल्ह्यांमध्ये ऊस उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे ऊस लागवड लांबली तर यंदाच्या पावसाळ्यात पाऊसमान कमी झाल्याने उसाच्या वाढीवरही विपरीत परिणाम झाला. याचा थेट फटका साखर उताऱ्यावर दिसून आला. यंदा १ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गाळप हंगामात सुरुवातीला साखर उतारा गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी होता. त्यामुळे साखर उत्पादन घटेल अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र १४ फेब्रुवारीपर्यंत राज्यात ९.८३ टक्के साखर उतारा मिळाला आहे. गेल्या वर्षी देखील ९.८३ टक्के साखर उतारा मिळाला होता. साखर उतारा वाढल्याने साखरेचे उत्पादन देखील वाढण्याची अपेक्षा साखर कारखानदारीकडून व्यक्त करण्यात येत आहे.

यंदा राज्यात आतापर्यंत १०३ सहकारी व १०४ खासगी अशा एकूण २०७ कारखान्यांनी मिळून ७९०.६५ लाख टन उसाचे गाळप केले आहे. यातून ७७.६८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर चार कारखान्यांनी आपला गाळपहंगाम आटोपता घेतला आहे. यात सोलापूर विभागातील १, छत्रपती संभाजीनगर विभागातील २ व नांदेड विभागातील एका कारखान्याचे धुराडे बंद झाले आहे. गेल्या वर्षी १०६ सहकारी तर १०५ खासगी अशा २११ कारखान्यांनी मिळून ८६५.९६ लाख टन उसाचे गाळप करत ८५.१२ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. तर १५ कारखान्यांनी आपला हंगाम पूर्ण केला होता.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाल्याने साखर हंगाम कमी काळ चालेल अशी अपेक्षा होती. ऊस उत्पादनाचा अंदाज घेता मार्च अखेरपर्यंत गाळपहंगाम सुरू राहील. - अनिल कवडे, आयुक्त, साखर

Web Title: increased sugar intake Production 77.6 lakh tonnes season to end March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.