साखरेचे उत्पादन वाढल्याने इथेनॉल निर्मितीवर भर देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:08 AM2021-06-26T04:08:36+5:302021-06-26T04:08:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उसाच्या क्षेत्रात यंदा वाढ झाली आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन तब्बल ११२ लाख टन होण्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उसाच्या क्षेत्रात यंदा वाढ झाली आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन तब्बल ११२ लाख टन होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे साखरेचा खप कमी झाल्याने यातून साखर कारखान्यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात येण्याची शक्यता आहे.
साखर आयुक्त कार्यालयाकडून पुढील वर्षीच्या गाळप हंगामाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार १२.३२ लाख हेक्टरवर ऊस उभा आहे. त्यातून १०९६ लाख टन उसाचे गाळप होईल. त्यामधून ११२ लाख टन साखर निर्माण होईल. १० लाख टन ऊस इथेनॉलसाठी शिल्लक ठेवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावर्षी किमान १३० कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट असणार आहे.
मागील वर्षी १२ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता. त्यातून गाळप होऊन १०६ लाख टन साखरचे उत्पादन झाले. त्याआधीची सुमारे ४० लाख टन साखर कारखान्यांकडे शिल्लक आहे. निर्यातीसाठी अनुदान द्यावे लागत असल्याने केंद्र सरकार देशासाठी ६० लाख टनांच्या पुढे कोटा वाढवून द्यायला तयार नाही. देशात आरोग्यविषयक जागरूकता वाढली आहे, त्यामुळे साखरेचा अपेक्षित खप होत नाही. कारखान्यांना साखर गोडाऊनमध्ये शिल्लक ठेवावी लागते. यातून सध्याच साखर कारखान्यांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. येत्या वर्षांच्या साखर उत्पादनातून त्यात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.
--//
साखर उद्योगाला आता अपरिहार्यपणे इथेनॉल निर्मितीकडे वळावे लागेल. त्यादृष्टीने नियोजन सुरूही झाले आहे. मागील वर्षी ६ लाख टन गाळप इथेनॉलकडे वळवून १०८ कोटी लिटर इथेनॉलचे उद्दिष्ट गाठले गेले. पुढील वर्षी १० लाख टन गाळप साखरेऐवजी इथेनॉलकडे वळवून १३० कोटी लिटर किंवा त्यापेक्षा जास्त उद्दिष्ट दिले जाईल, अशी शक्यता आहे.
- शेखर गायकवाड- साखर आयुक्त
-------------------
इथेनॉलचा वापर फायदेशीर
इथेनॉल हा एक अल्कोहोल द्रव्य असून, ते उसापासून निर्माण केले जाते. याचा वापर पेट्रोलमध्ये करून ते वाहनांना वापरले जाते. याच्या वापराने ३५ टक्के कार्बन मोनोऑक्साइडचे उत्सर्जन कमी होते. इथेनॉलचा वापर इंधनासाठी वाढविला तर परदेशातून इंधनाची आयात कमी होऊ शकते. त्यामुळे साखरेपासून इथेनॉलची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली तर त्याचा देशाला फायदाच होणार आहे. दरम्यान, येत्या २०२२ पर्यंत पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल वापरण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे.
--------------------