चाचण्या वाढल्याने कोरोनाबाधित उजेडात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:14 AM2021-02-27T04:14:53+5:302021-02-27T04:14:53+5:30
जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शहरात सरासरी २५००-३००० चाचण्या होत होत्या. फेब्रुवारी महिन्यामध्ये रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर पॉझिटिव्हिटी रेटही अचानक ...
जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शहरात सरासरी २५००-३००० चाचण्या होत होत्या. फेब्रुवारी महिन्यामध्ये रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर पॉझिटिव्हिटी रेटही अचानक वाढू लागला. जानेवारी महिन्यात पॉझिटिव्हिटी रेट ६ ते ७ टक्क्यांच्या दरम्यान होता. फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या पुढे गेला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारीचे उपाय म्हणून चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास दुखणे अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचण्या करुन घ्याव्यात, असे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.
----------------------------------
फेब्रुवारी महिन्यात कोरोनाग्रस्तांचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. पॉझिटिव्हिटी रेटही ६-७ टक्कयांवरुन १० टक्कयांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग, हात धुणे या सवयींचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे.
- डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
----------------------
व्हायरल इन्फेक्शनमध्ये वाढ
एकीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढत असताना शहरात व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. हवामानातील बदल, वाढता संपर्क अशा विविध कारणांमुळे सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, अंगदुखी, कणकण, डोकेदुखी अशा तक्रारी नागरिकांमध्ये वाढताना दिसून येत आहेत. फ्लूची लक्षणे कोरोनाची मिळतीजुळती असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, कोणतेही लक्षण दिसले तरी घाबरुन न जाता थेट डॉक्टरांकडे जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन वैद्यकतज्ज्ञांनी केले आहे. आपल्याला कोरोना तर झाला नसेल ना, अशा भीतीने डॉक्टरांकडे जाणे टाळू नये. वेळीच निदान आणि औषधोपचार हाच योग्य मार्ग आहे, असे जनरल फिजिशियन डॉ. रोहित औटी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दिनांक चाचण्या कोरोनाग्रस्त रुग्णसक्रिय रुग्ण
२६ फेब्रु. ७१०८ ७२७ ४२५३
२५ फेब्रु. ६५५६ ७६६ ३९३०
२४ फेब्रु. ६५१४ ७४३ ३५५९
२३ फेब्रु. ४६०६ ६६१ ३२०१
२२ फेब्रु. ४४१४ ३२८ २९०२
२१ फेब्रु. ४७०७ ६३४ २८९६
२० फेब्रु. ४६३४ ४१४ २५६१