चाचण्या वाढल्याने पॉझिटिव्हिटी रेट कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:13 AM2021-03-01T04:13:15+5:302021-03-01T04:13:15+5:30
पुणे : गेले अकरा महिने कोरोनाशी सातत्याने लढा सुरू आहे. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोना काहीसा आटोक्यात आला असे वाटत असतानाच ...
पुणे : गेले अकरा महिने कोरोनाशी सातत्याने लढा सुरू आहे. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोना काहीसा आटोक्यात आला असे वाटत असतानाच १५ फेब्रुवारीपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली. मागील आठवड्यात शहरातील पॉझिटिव्हिटी रेट (रुग्णबाधित होण्याचे प्रमाण) ११ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. २२ ते २८ फेब्रुवारी या काळात चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुग्ण वाढले असले, तरी पॉझिटिव्हिटी रेट १०.८७ टक्क्यांवरून ९.७० टक्क्यांवर पोहोचला आहे. आठवड्याचा मृत्यूदर ०.६ टक्के इतका नोंदवला गेला आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहरात दररोज सरासरी २५००-३००० चाचण्या होत होत्या. त्यानंतर कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढू लागले. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले. १५ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत २७,३१९ चाचण्या करण्यात आल्या. तर, २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत आठवड्याभरात सुमारे ४५,००० चाचण्या करण्यात आल्या. म्हणजेच, दररोजच्या चाचण्यांचे प्रमाण सरासरी ७००० इतके आहे. या आठवड्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे.
मागील रविवारी, २१ फेब्रुवारी रोजी शहरात ६३४ कोरोनाग्रस्त रुग्णांचे निदान झाले होते. त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी ३२८ रुग्ण आढळून आल्याने काहीसा दिलासा मिळाला. त्यानंतर मंगळवारपासून रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. रविवारी, २८ फेब्रुवारी रोजी आठवड्यातील सर्वाधिक म्हणजे ७७४ इतकी रुग्णसंख्या पाहायला मिळाली. सध्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण ४९१९ इतके आहे, तर गंभीर रुग्णांची संख्या २६१ इतकी आहे. रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने मास्क वापरणे, हात धुणे आणि शारीरिक अंतर राखणे या उपाययोजनांकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे. पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचे नसेल तर नागरिकांना जबाबदारीने वागावे लागेल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
---------------------
सप्टेंबर महिन्यात होता सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट
मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर सर्वत्र कोरोनाची दहशत निर्माण झाली. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोरोनाचा उद्रेक अनुभवायला मिळाला. दररोजच्या कोरोनाग्रस्तांची संख्या २००० पर्यंत पोहोचली होती. सप्टेंबर महिन्यात ३२ टक्के इतका सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट होता. डिसेंबर महिन्यात सर्वात कमी म्हणजे ६ टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट पाहायला मिळाला.
-------------------------
आठवड्यातील पॉझिटिव्हिटी रेट :
तारीख चाचण्या रुग्णमृत्यू
२८ फेब्रु ७४७३ ७७४ २
२७ फेब्रु ८०४१ ७३९ ६
२६ फेब्रु ७१०८ ७२७ ६
२५ फेब्रु ६५५६ ७६६ ४
२४ फेब्रु ६५१४ ७४३ ३
२३ फेब्रु ४६०६ ६६१ ४
२२ फेब्रु ४४१४ ३२८ ४
-------------------------------------------------------
एकूण ४४,७१२ ४३३८ २९
---------------------------
महिन्याभरातील पॉझिटिव्हिटी रेट :
कालावधी चाचण्या कोरोनाग्रस्त रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट
१-७ फेब्रुवारी २२,५६४ १२७५ ५.६५
८-१४ फेब्रुवारी २१,२४८ १८१६ ८.५४
१५-२१ फेब्रुवारी २७,३१९ २९७० १०.८७
२२-२८ फेब्रुवारी४४,७१२ ४३३८ ९.७०