आरोग्य लाभासाठी वाढले शहरी गरीब
By Admin | Published: April 5, 2017 12:48 AM2017-04-05T00:48:16+5:302017-04-05T00:48:16+5:30
आरोग्य योजनांच्या लाभासाठीच ‘शहरी गरीब’ वाढल्याचे दिसून आल्याने आता राजीव गांधी योजनेशी शहरी गरीब योजना जोडली जाणार आहे
पुणे : आरोग्य योजनांच्या लाभासाठीच ‘शहरी गरीब’ वाढल्याचे दिसून आल्याने आता राजीव गांधी योजनेशी शहरी गरीब योजना जोडली जाणार आहे. या योजनेचे कार्ड असणाऱ्यांनाच भविष्यात आता लाभ मिळणार आहे. गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शहरी गरीब योजनेतंर्गत अनेक बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे निदर्शनास आले. लोकप्रतिनिधींचे नातेवाईक व उच्च उत्पन्न गटांतील रुग्णांना याचा अधिक लाभ झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
गेल्या दहा वर्षांत योजनेसाठीचा खर्च ९३ लाख रुपयांवरून २६ कोटींवर पोहोचला. यामुळेच बोगस लाभार्थी टाळण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने ‘शहरी गरीब योजना’ शासनाच्या राजीव गांधी आरोग्य योजनेशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
शहराच्या हद्दीत राहणाऱ्या व एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांना अर्थसहाय करण्यासाठी महापालिकेने सन २०१२-१३मध्ये ‘शहरी गरीब योजना’ सुरू केली. या योजनेतंर्गत महापालिकेकडून रुग्णांना सुमारे एक लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य केले जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित रुग्णाकडे महापालिकेचे हेल्थकार्ड व शासकीय अधिकाऱ्यांचा एक लाखाच्या आता उत्पन्न असल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
गेल्या सहा वर्षांत या योजनेंतर्गत शहरातील तब्बल पन्नास हजारांहून अधिक नागरिकांना विविध दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी या योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला.
परंतु ही योजना राबविताना अनेकदा रुग्णांकडून महापालिकेचे हेल्थकार्ड नसताना मागणी होऊ लागली. यामध्ये लोकप्रतिनिधींचा दबाव आल्यानंतर ऐनवेळी हेल्थकार्ड काढून मदत करणे, उत्पन्नाचा दाखला वेळेत सादर न करणे, काही लोकप्रतिनिधींकडून आपल्याच नातेवाइकांना लाभ देणे, उच्च उत्पन्न गटातील रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी येणारा दबाव यामुळे योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे निदर्शनास आले.
(प्रतिनिधी)
>योजनेला ‘आधार’ जोडणार
या योजनेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आरोग्य विभागाने ही योजना केंद्र शासनाच्या राजीव गांधी आरोग्य योजनेशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. एक लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असलेल्या नागरिकांची रेशनकार्ड काढतानाच राजीव गांधी आरोग्य योजनेसाठी नोंद केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार लिकिंगदेखील बंधनकारक आहे. त्यामुळे यापुढे राजीव गांधी आरोग्य योजनेचे कार्ड असणाऱ्या व्यक्तींनाच महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच दोन्हीपैकी कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ घेता येईल अशी अटदेखील घालण्यात येणार आहे. यासाठी योजनेत अनेक बदल करावे लागणार असून, याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.